उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतरामागे ऐतिहासिक कारण!, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक किंवा जातीय द्वेष, तेढ निर्माण होणार नाही, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला.

मुंबई : उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यामागे राजकीय नव्हे, तर ऐतिहासिक कारणे आहेत. त्यामुळे नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक किंवा जातीय द्वेष, तेढ निर्माण होणार नाही, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला. याउलट स्कंद पुराण आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या गॅझेटमध्येही (१९०९च्या इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया) उस्मानाबादचे नाव धाराशिव असल्याचेही नमूद होते, असा दावाही सरकारने केला. तसेच आपल्या निर्णयाचे समर्थन केले. उस्मानाबादच्या नामकरणामुळे बहुसंख्य नागरिकांनी आनंद साजरा केल्याचा दावाही राज्य सरकारने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.