“एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी, फार काळ..”, संजय राऊत यांची बोचरी टीका

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना राहुल नार्वेकर खोटारडे आहेत असंही म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एवढंच नाही तर राहुल नार्वेकर खोटं बोलत असल्याचे सगळे पुरावे आम्ही दिले आहेत. शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे ती पायदळी तुडवण्याचं काम ज्यांनी केलं ते कसले मराठी? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसंच एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

“उद्धव ठाकरेंनी जे आव्हान दिलंय की जनतेत येऊन सांगा शिवसेना कुणाची ते अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलं पाहिजे. हिंमत असेल तर जनतेसमोर या, त्यानंतर जो निकाल आहे तो छातीठोकपणे सांगा. तसंच आम्ही जेव्हा पुरावे दाखवले तेव्हा राहुल नार्वेकर बिन काचेचा गॉगल लावून बसले होते का?” असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

हे वाचले का?  Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश अन् उमेदवाऱ्याही जाहीर; ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना अप्रत्यक्ष इशारा?

जनता न्यायालयात आम्ही सगळे पुरावे दिले

“जनता न्यायालयाच्या स्क्रिनवर आम्ही सगळे पुरावे दाखवले आहेत. त्यावेळी राहुल नार्वेकर हे बिन भोकांचा चश्मा लावून बसले असतील त्यामुळे त्यांना दिसलं नसेल” असंही संजय राऊत म्हणाले. तसंच पुढची ३० वर्षे भाजपा सत्तेत राहिल यासाठी तयारी करा असं अमित शाह यांनी जे आवाहन केलंय त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. “सध्या २०२४ हे वर्ष सुरु झालंय. पुढचे सहा महिने भाजपा टिकली तर मी रामाला अभिषेक करेन” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हे वाचले का?  Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…

एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी

“लोकसभेच्या मुंबईतल्या दोन जागा शिंदे गट लढवेल ती पण कमळाच्या चिन्हावर लढवणार आहे असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शिवसेनाच नाही. तो सगळा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. शिवसेना आम्ही आहोत. आम्ही २३ जागा लढतो आहोत. आमची शिवसेना खरी शिवसेना आहे. आत्ताची शिवसेना म्हणजे पाकिटमारी आहे. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं हे फार काळ टिकणार नाही. मुंबईतल्या शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योजक ठरवतील.” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

हे वाचले का?  माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार