“एकनाथ शिंदेंनी सगळ्या जागा सोडायच्या मान्य केलं का?”, नाशिकच्या जागेवरून संजय शिरसाटांचा संताप

नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रहच नाही तर हट्टही आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

 नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. नाशिकवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांच्यात सुप्त संघर्ष चालू आहे. जागेचा तिढा सुटण्याची घटिका समीप येत असताना शाब्दिक द्वंद्व वाढले आहे. नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळायला हवी, हा नाशिककरांचा आग्रह असल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी करताच तो माजी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी लगेचच खोडून काढला.  यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त केला आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

नाशिकच्या जागेवरचा निर्णय झालेला नाही. कोणी उड्या मारू नये, असं प्रफुल पटेल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, “हे कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सांगितलं तर बरं होईल. तेथील खासदाराला डिवचण्यासाठी काही लोक आग्रही मागणी करत आहेत. तिथे शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, हा आमचा आग्रहच नाही तर हट्टसुद्धा आहे. म्हणून ती जागा आम्ही मिळवणार याबद्दल शंका नाही. हा आमच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न झाला आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

एकनाथ शिंदेंनी सगळ्या जागा सोडायच्या मान्य केलं का?

“एकनाथ शिंदे यांनी सगळ्या जागा सोडायची मान्य केलं का? शिरुराची जागा तुम्हाला दिली आहे.आम्ही आमच्या जागा लढवू असा इशारा देत रत्नागिरीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील”, असंही संजय शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजी नगरमधून कोण?

शिंदे गटाने अद्याप छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार जाहीर केलेला नाही. याबाबत ते म्हणाले, ही जागा शिवसेनेची आहे. ती आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल. उमेदवारांची स्पर्धा असल्याने निर्णय घेणं जड जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यात तीन नावांची चर्चा आहे. यात संदीपान भूमरे, जंजाळ, विनोद पाटील यांची नावे चर्चेत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!