पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन, पाकिस्तानला टोला
सर्व सदस्य देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्व तसेत प्रादेशिक एकात्मतेचा मान राखावा, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी बैठकीत चीन व पाकिस्तान यांना टोला लगावला आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना झालेल्या आठ सदस्यांच्या शांघाय सहकार्य संघटना बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. दुसरीकडे पाकिस्तानही सीमावर्ती भागातून भारतात दहशतवाद पसरवित आहे त्यामुळे पंतप्रधानांचे हे विधान पाकिस्तानलाही लागू पडणारे आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत हे सूचक वक्तव्य केल्याने त्याला विशेष अर्थ आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन होते. भारताच्या इतर देशांशी संबंधाबाबत त्यांनी सांगितले की, भारताला विविध देशांशी संबंध वाढवताना त्यांच्याशी विविध मार्गानी जोडणी महत्त्वाची वाटते.
पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी सांगितले की, काही देश द्विपक्षीय प्रश्न या मंचावर उपस्थित करतात ते शांघाय सहकार्य संघटना ज्या तत्त्वांवर स्थापना झाली त्याच्या विरोधात आहे. भारताने या संघटनेच्या तत्त्वांचे नेहमीच पालन केले आहे पण काही देश दुर्दैवाने त्यात द्विपक्षीय प्रश्न आणतात.
कोविड १९ साथीबाबत त्यांनी सांगितले की, भारत आपली लस उत्पादन व वितरण क्षमता सर्व मानवतेच्या कल्याणासाठी वापरणार आहे. या कठीण काळात भारताच्या औषध उद्योगांनी मोठी कामगिरी केली असून १५० देशांना भारताने औषधांचा पुरवठा केला आहे.