अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी गिलियडने (Gilead) एचआयव्हीसाठी अत्यंत प्रभावी अँटीरेट्रोव्हायरल लेनाकापावीर (Lenacapavir) संशोधन केलं आहे.
‘एचआयव्ही’ हा एक दीर्घकालीन आजार असून या आजारामध्ये संबंधित व्यक्तीचा हळूहळू मृत्यू होऊ शकतो. या आजाराशी अनेकजण लढा देत आहेत तर या आजारामुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, या आजारावर उपचार करण्यासाठी आता प्रभावी उपचार सर्वसामान्यांनाही उपलब्ध होतील. कारण एका नव्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार ‘एचआयव्ही’चं ४२ हजार डॉलर्सचं औषध फक्त ४० डॉलर्समध्ये मिळू शकतं.
अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी गिलियडने (Gilead) एचआयव्हीसाठी अत्यंत प्रभावी अँटीरेट्रोव्हायरल लेनाकापावीर (Lenacapavir) संशोधन केलं आहे. या औषधाची किंमत प्रति रूग्ण ४० डॉलर इतकी असू शकते. सध्याच्या ४२ हजार डॉलर्सपेक्षा हजारपट कमी आहे, असं गिलियडने मंगळवारी एका नवीन संशोधन अभ्यासाचा हवाला देत म्हटलं आहे. दरम्यान, एचआयव्हीच्या औषधाचा खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असा अंदाज यावरून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या एचआयव्हीच्या औषधाची किंमत जी प्रति व्यक्ती प्रति वर्ष ४२ हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ती ४० डॉलर्स पेक्षा कमी केली जाऊ शकते.
दरम्यान, अमेरिकन फार्मास्युटिकल दिग्गज गिलियडने विकसित केलेले अँटीरेट्रोव्हायरल औषध, लस एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी १०० टक्के प्रभावी असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे. हे औषध वर्षातून दोनदा द्यावे लागते. त्यामुळे एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी हे औषध महत्वाचे ठरू शकते, असा निष्कर्ष लावला जात आहे.
ब्रिटनच्या लिव्हरपूल विद्यापीठातील संशोधक अँड्र्यू हिल यांनी यासंदर्भात सांगितलं की, ही लस लसीकरणासारखी आहे. म्युनिक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेत अँड्र्यू हिल यांनी हे नवीन संशोधन सादर केलं आहे. औषध उत्पादक गिलियडने स्वस्त जेनेरिक इंजेक्शन्सच्या निर्मितीला परवानगी दिली तर हे औषध बनवण्याचा खर्च किती कमी होऊ शकतो, हे संशोधनात मांडण्यात आले. या संशोधनानुसार, एका वर्षाच्या किंमतीचे औषध ४० डॉलर्स पेक्षा कमी किंमतीत दिले जाऊ शकते. दरम्यान, हे औषध मुळात एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका असलेल्या लोकांना दिले तर ते थांबवू शकते. या औषधाच्या मदतीमुळे आपण या संसर्गावर नियंत्रण ठेवू शकतो, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.
एचआयव्ही संसर्ग म्हणजे काय?
एचआयव्ही किंवा मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा एक विषाणू आहे. जो विषाणू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. एचआयव्ही हा व्हायरस आहे, तर एड्स हा एक आजार आहे. एचआयव्ही हे असे इन्फेक्शन आहे जे रक्तावाटे लोकांच्या शरीरात पसरते. एकदा हा संसर्ग शरीरात शिरला तर तो आयुष्यभर राहू शकतो.