‘एनआयसी’तील संगणकांवर हॅकर्सचा हल्ला!

Made with Canon 5d Mark III and loved analog lens, Leica APO Macro Elmarit-R 2.8 / 100mm (Year: 1993)
Photo by Markus Spiske on Unsplash

चीनकडून भारतातील बडे नेते तसेच अधिकाऱ्यांची हेरगिरी केली जात असल्याचे प्रकरण ताजे असतानाच नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) अनेक संगणकांवर हॅकर्सने ‘हल्ला’ चढवला आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकणी गुन्हा दाखल केला असून स्पेशल सेलकडून तपास केला जात आहे. विशेष म्हणजे एनआयसीच्या संबं​धित संगणकांमध्ये देशाची सुरक्षा, नागरिक, अतिमहत्वाच्या व्यक्तींशी निगडीत माहिती उपलब्ध असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांपर्यंतची माहिती या संगणकामध्ये समाविष्ट असल्याने हॅकर्सच्या कृत्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

बंगळुरातील एका फर्ममधून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एनआयसीच्या कर्मचाऱ्यांना एक लिंक मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती. लिंकवर ज्यांनी क्लिक केले त्यांच्या संगणकातील डेटा उडवण्यात आला आहे. सायबर हल्ल्यात जवळपास शंभर संगणकांवर लक्ष साधण्यात आले आहे. यातील काही एनआयसीचे, तर काही मा​हिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित आहेत.

एनआयसीकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वेगाने तपास केला जात आहे. पंरतू, बंगळुरातील ज्या कंपनीतून हा मेल करण्यात आला होता त्या कंपनीला अमे​रिकेतील एका कंपनीकडून मेल आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयपी अॅड्रेसवरून यासंबंधीची माहिती उघडकीस आली.

वर्ष २०१९ मध्ये हॅकर्सने भारत सरकारच्या संकेतस्थळांना लक्ष्य केले होते. या व्यतिरिक्त, भारत सरकारसाठी काम करणारे काही खासगी नेटवर्क आणि डेटाबेस सर्व्हरवरही हल्ला केला होता. यासाठी भारत सरकारच्या ओपन व्हीपीएनशी जोडण्यासाठी व्हीपीएस प्रोव्हाइडर सर्व्हरचा वापर करण्यात आला. हॅकर्सनी भारतीय संगणकांवर ‘कोबाल्ट स्ट्राइक’ मालवेअर इन्स्टॉल केले होते. अमेरिकेसह जगातील बर्‍याच देशांमधील १०० हून अधिक कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. हॅकर्सने सोर्स कोड, सॉफ्टवेअर कोड सायनिंग सर्टिफिकेट, कस्टमर अकाउंट डेटा आणि व्यवसायाशी निगडीत माहिती चोरली. त्याच्या मदतीने रॅन्समवेअर आणि क्रिप्टो-जॅकिंगला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी