ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : भारताच्या अंकिता रैनाची गरुडभरारी

पुण्यात स्थायिक असलेल्या २८ वर्षीय अंकिताला महिला एकेरीच्या मुख्य फेरीत नशिबाच्या बळावर प्रवेश मिळवण्याची संधी आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरणारी पाचवी महिला टेनिसपटू

भारताच्या अंकिता रैनाला कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीमध्ये अंकिता रोमानियाच्या मिहेला बुझार्नेकूसह खेळणार असून या दोघींना थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारी अंकिता पाचवी महिला खेळाडू ठरली आहे.

पुण्यात स्थायिक असलेल्या २८ वर्षीय अंकिताला महिला एकेरीच्या मुख्य फेरीत नशिबाच्या बळावर प्रवेश मिळवण्याची संधी आहे. पहिली फेरी संपेपर्यंत एखाद्या खेळाडूने कोणत्याही कारणास्तव माघार घेतली, तर अंकिताला एकेरीतही खेळता येईल. परंतु स्पर्धेसाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाच तिने बुझानेकूसह दुहेरीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिला ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणारी पाचवी महिला टेनिसपटू ठरण्याचा मान मिळाला. यापूर्वी निरुपमा मंकड (१९७१), निरुपमा वैद्यनाथन (१९९८), सानिया मिर्झा (२००४) आणि शिखा उबेरॉय (२००४) या चौघींनी भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रम केला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

‘‘माझ्या एका मैत्रिणीने मिहेला महिला दुहेरीसाठी सहकारी शोधत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी त्वरित मिहेलाशी संवाद साधला आणि दोघींनीही एकत्रित खेळण्याचे ठरवले. यापूर्वी मी कधीही मिहेलासह खेळली नसली तरी डावखुऱ्या खेळाडूंसह खेळण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे मिहेलासह खेळण्यासाठी मी आतुर आहे,’’ असे अंकिता म्हणाली. अंकिता आणि मिहेला यांच्यापुढे पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ओलिव्हिया गॅडेकी आणि बेलिंडा वूलकॉक यांचे आव्हान असून बुधवारी ही लढत होणार आहे.

अंकिताव्यतिरिक्त पुरुष एकेरीत सुमित नागल आणि दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे अनुभवी भारतीय खेळाडू खेळताना दिसतील. नागलची सलामी लढत लिथुनियाच्या रिकार्डस बोरान्किसशी होणार आहे. शरण स्लोव्हाकियाच्या इगोर झेलेनायसह खेळणार असून त्यांच्यापुढे पहिल्या फेरीत जर्मनीच्या केव्हिन क्रॉवेट आणि यानिक हँफन या जोडीचे आव्हान असेल. बोपण्णा जपानच्या बेन मॅकलाचलनसह खेळणार असून या जोडीची पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम जी संग आणि मिन क्यू साँग या जोडीशी गाठ पडणार आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

जोकोव्हिच, सेरेनाकडे लक्ष

सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेली अमेरिकेची सेरेना विल्यम्स या खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत चाहत्यांचे प्रामुख्याने लक्ष असेल. अग्रमानांकित जोकोव्हिचचा पहिल्या फेरीत फ्रान्सच्या जेरेमी चॅर्डीशी सामना होणार आहे, तर ३९ वर्षीय सेरेनापुढे जर्मनीच्या लॉरा सिंगमंडचे आव्हान असेल. याव्यतिरिक्त डॉमिनिक थीम, सिमोना हॅलेप, अ‍ॅश्ले बार्टी यांनाही जेतेपदाची संधी असून स्पर्धेतून माघार घेतलेल्या रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅम जेतेपदांना मागे सारण्यात राफेल नदाल यशस्वी होणार का, हे पाहणेही रंजक ठरेल.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

एकेरी असो वा दुहेरी, भारतासाठी ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने मी फार आनंदी आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर मी इथवर मजल मारली आहे. माझ्या या प्रवासाद्वारे युवा पिढीतील मुलींना त्यांच्या आवडत्या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल. – अंकिता रैना,  भारताची टेनिसपटू