ओला कंपनी बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत!; ११ हजार कोटी जमा करण्याची योजना

भांडवली बाजारातून निधी उभारण्यासाठी अनेक स्टार्टअप्स तयारी करत आहेत. आता भारतात वाहतूक सेवा देणारी ओला कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

भांडवली बाजारातून निधी उभारण्यासाठी अनेक स्टार्टअप्स तयारी करत आहेत. आता भारतात वाहतूक सेवा देणारी ओला कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ७३२४ ते १०,९८५ कोटी जमा करण्याची शक्यता आहे. ओला डिसेंबरच्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर २०२१) आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करण्याची शक्यता आहे. आयपीओसाठी कंपनी सिटी ग्रुप आणि कोटक महिंद्रा बँकेसोबत व्यवस्थापन करत असल्याचं बोललं जात आहे. ओला ऑपरेट करणारी एएनआय टेक्नॉलॉजी हा आयपीओ बाजारात आणणार आहे. या आयपीओ व्यवस्थापनात आणखी काही बदल होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

भावीश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी १० वर्षापूर्वी म्हणजेच २०११ या वर्षात ओलाची सुरुवात केली होती. ही कंपनी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये सेवा पुरवते. ओलाने आतापर्यंत ४०० कोटी डॉलर्सचा फंड जमवला असल्याचा अंदाज आहे. ओलाने जुलै २०२१ मध्ये टेमासेक, वारबर्ग पिनकसच्या प्लम वुड इनव्हेस्टमेंट आणि भावीश अग्रवाल यांच्या कंपनीच्या माध्यमातून ३,७३३ कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली होती. “कंपनी पुढच्या वर्षी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित नाही. ओलाच्या आयपीओतून सॉफ्ट बँक, टायगर ग्लोबल आमि स्टीडव्यू कॅपिटल सारख्या गुंतवणूकदारांना कंपनीतील आपला पूर्ण किंवा काही हिस्सा विकण्याची संधी मिळणार आहे”, असं ओलाचे सह-संस्थापक भावीश अग्रवाल यांनी सांगितलं होतं.

हे वाचले का?  Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

“कंपनीने मागच्या एका वर्षात आपला व्यवसाय झपाट्याने वाढवला आहे. लॉकडाउनंतर ओलाच्या व्यवसायात सुधारणा झाली आहे. बहुतेक जण सार्वजनिक वाहतुकीपेक्षा वैयक्तिक प्रवासाला प्राधान्य देत आहेत.”, असं अग्रवाल यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ओलाची स्थिती चांगली आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं होतं.