औदुंबरनजीक कृष्णाकाठी तिबेटी पाहुण्यांचे आगमन

देखण्या चक्रवाकच्या दर्शनासाठी अभ्यासक, पर्यटकांची पसंती

कृष्णाकाठी वसलेल्या औदुंबरनजीकच्या कोंडार परिसरात तिबेटी पाहुणे असलेल्या चक्रवाक पक्ष्यांचे आगमन झाले आहे. तिबेट, लडाखमधून येणाऱ्या या देखण्या पक्ष्याला पाहण्यासाठी पक्षिनिरीक्षक, पर्यटकांचे पाय आमणापूरच्या कोंडार परिसराकडे वळू लागले आहेत.

चक्रवाक हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेटमधील आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात. उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. चीन , मंगोलियामध्येही या पक्ष्याविषयी आदराची भावना आहे.

हिमालयातील साधारणपणे २१ हजार फूट सर्वाधिक उंच रांग ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. अशी माहिती येथील पक्षिप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली.

या पक्ष्याचे खास वैशिष्टय़ म्हणजे, या पक्ष्यांची जोडी एकदा जमली की ते एकमेकांना आयुष्यभर एकनिष्ठेने साथ देतात. या जोडीतील एखाद्याचा मृत्यू झाला तर दुसरा पण विरह वेदनेने मृत्यू पत्करतो अशी मिथककथा सांगितली जाते. त्यामुळेच निस्सीम प्रेम, विरह, जोडीदारावर दृढ विश्वासाचे प्रतीक असलेल्या चक्रवाक पक्ष्याला संत साहित्यात मानाचे स्थान आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्याबरोबरच कवी कालिदासनेही चक्रवाकच्या निस्सीम प्रेमाचे दाखले दिले आहेत.

चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ (काळा कंठ), पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट असतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तुळ (काळा कंठ) नसते.