कचरा वर्गीकरणासाठी शहरात कर आकारणीची गरज नाही

घन कचरा व्यवस्थापन आणि पुनर्निर्मिती प्रक्रिया बळकट करण्याच्या कामी स्त्रोताच्या ठिकाणी कचऱ्याचे विलगीकरण महत्त्वाचे ठरते.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे प्रतिपादन

नाशिक : बंगळुरू, चंदीगढसारख्या शहरात कचऱ्याचे जागच्या जागी वर्गीकरण करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिमाह २०० ते ६०० रुपये कचरा कर आकारण्याचा विचार केला जात आहे. तथापि, नाशिक शहरात ९० टक्क्यांहून अधिक घरांमध्ये आधीपासन कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. संकलित केलेला हा कचरा पुन्हा वर्गीकरण प्रक्रियेतून जातो. काही खत तर काही कचऱ्याचा पुनर्निर्मितीसाठी वापर केला जातो. निरुपयोगी कचऱ्याचा ऊर्जा म्हणून उपयोग केला जातो. यामुळे शहरात कचरा विलगीकरणासाठी तसा कर वसूल करण्याची गरज नसल्याचे मत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केले.

सध्या देशात कचऱ्यावर कर आकारणीवरून वाद सुरू आहे. कचऱ्याचे जिथल्या तिथे म्हणजे स्त्रोताच्या ठिकाणी वर्गीकरण करण्याच्या सवयीला चालना देण्यासाठी बंगुळूरू, चंदीगढसारख्या महापालिका महिन्याला कर आकारण्याचा विचार करीत आहे. अन्य शहरांपेक्षा नाशिकची स्थिती वेगळी आहे. विलगीकरण केल्याशिवाय घंटागाडीद्वारे कचरा स्वीकारला जात नाही. त्यामुळे नागरिकांना घरातील ओला, सुका कचरा वेगळा करून देण्याची सवय आधीपासून जडलेली आहे. संकलित केलेला कचरा महानगरपालिकेच्या खत प्रकल्पावर नेल्यावर आणखी एका वर्गीकरण प्रक्रियेतून जातो. तिथे प्लास्टिकच्या बाटल्या, लोखंडी डबे यांसारख्या पुनर्निर्मितीक्षम असलेल्या वस्तू वेगळ्या केल्या जातात. उर्वरित कचऱ्याचा खत निर्मितीसाठी वापर केला जातो. प्लास्टिक पिशव्या, बिस्किटांची वेष्टने, ‘टेट्रा पॅक’ यांसारखा पुनर्निर्मितीसाठी निरुपयोगी कचरा जाळून ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.

हे वाचले का?  Samruddhhi Highway : समृद्धी महामार्गावरील ८ किमीच्या बोगद्याची खासियत, इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या १० मिनिटांत कापलं जाणार

घन कचरा व्यवस्थापन आणि पुनर्निर्मिती प्रक्रिया बळकट करण्याच्या कामी स्त्रोताच्या ठिकाणी कचऱ्याचे विलगीकरण महत्त्वाचे ठरते. समाजात बदल घडवून आणायचा असेल तर कचऱ्याचे विलगीकरण हा नागरिकांच्या सवयीचा भाग बनायला हवा, त्याची सक्ती होऊ  नये. नाशिकचे नागरिक पर्यावरण आणि शहराप्रति आपल्या जबाबदारीबद्दल अधिकाधिक सजग होत आहे, त्यामुळे इथे कोणताही कचरा कर लागू करण्याची आमची योजना नसल्याचे जाधव यांनी सूचित केले.

हे वाचले का?  नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका

स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत कचऱ्याचे स्त्रोताच्या ठिकाणी विलगीकरण करण्याच्या सवयीबरोबर घरच्या घरी खत निर्मितीस प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत ९० टक्क्यांहून अधिक घरांमध्ये कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. शहरात निर्माण होणाऱ्या बहुतांश कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने शहराचे पर्यावरण अधिक स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होईल.

शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. वेष्टिणाच्या साहित्याच्या विल्हेवाटीविषयी जागरुकता वाढल्यास शहराचे सौंदर्य कायम राहील, असेही जाधव यांनी नमूद केले. कचरा व्यवस्थापनाबाबत रसायनशात्र संस्थेचे माजी उपकुलगुरू आणि मानद प्रा. जी. डी. यादव यांनी ग्राहकांनी जबाबदारीने कागद, लाकूड, प्लास्टिक, धातू,  काच आदी विविध प्रकारचे पदार्थ वेगळे करून त्यांची विल्हेवाट लावणे इथपासून कचरा व्यवस्थापनाच्या प्रवासाची सुरुवात होते याकडे लक्ष वेधले.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी