कठोर टाळेबंदीचे पालकमंत्री भुजबळ यांच्याकडून समर्थन

वाढत्या रुग्णसंख्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: टाळेबंदीमुळे काही प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असून गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्याही एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. बांधितांची संख्या पूर्णत: कमी करण्यासाठी जिल्ह्याात कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सहकार्याने करोना विरुध्दची लढाई जिंकली जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

बुधवारपासून लागू होत असलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्र्यांनी चित्रफितीद्वारे संवाद साधला. करोनाची दुसरी लाट थोपवायची असेल तर कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त होते. गेल्या वर्षी पहिल्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या १६ ते १७ हजारापर्यंत गेली होती. दुसऱ्या लाटेत तो आकडा ४६ हजारावर पोहोचला. अंशत: टाळेबंदीने तो कमी झाला, पण काही दिवसांपासून ही संख्या ३३ अथवा ३४ हजारापेक्षा खाली येत नाही, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

वाढत्या रुग्णसंख्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यात प्राणवायू, खाटा, औषध, डॉक्टर, परिचारिका आदींचा समावेश आहे. खाटा वाढविल्या गेल्या. २९ प्राणवायू निर्मिती केंद्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले. इतके सर्व करूनही प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही. करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर लक्ष दिले जात आहे. खासगी डॉक्टर पुढे येत आहेत. मदत मिळत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

आधीच्या निर्बंधामुळे जिल्ह्यात १० ते १२ हजाराच्या खाली आकडा आला नाही. मृत्यू वाढत आहे. रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी हे कठोर पावले उचलावी लागत आहेत. कठोर निर्बंधामुळे शेतमालाचे काहीअंशी नुकसान होईल. माणसे वाचविण्यासाठी हे स्वीकारावे लागेल, असेही भुजबळ म्हणाले.