कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

भारत सरकारने या सगळ्यांची शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. आता कतारकडून या आठ जणांना सोडलं जाणं हे भारतासाठी मोठं यश मानलं जातं आहे.

भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र आता ही बातमी येते आहे की या आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत.

कतारमध्ये ज्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांची कतारने सुटका केली. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया आता परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

भारतमाता की जय चे नारे

भारतात जेव्हा माजी नौसैनिक परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारतमाता की जय या घोषणा दिल्या. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता तर आम्ही सुटका कठीण होती असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे.

काय घडलं होतं २०२३ मध्ये?

कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. २०२३ मधलं म्हणजेच गेल्यावर्षी प्रकाशात आलेलं हे प्रकरण आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने २६ ऑक्टोबर २०२३ रोजी या कतारने जो मृत्यूदंडाचा निर्णय सुनावला होता त्याविषयी एक निवेदन जारी करून या निकालाबाबत चिंता व्यक्त केली. “भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय अनपेक्षित असून, आम्ही तपशीलवार निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करू” असं त्यावेळी भारताने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता आज या नौसैनिकांची सुटका झाली आहे.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

नौदलाचे ते आठ माजी सैनिक कोण?

कतारने ज्या माजी सैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, त्यामध्ये नौदलाच्या मोठ्या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश अशी या नौसैनिकांची नावे आहेत. कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत ते कार्यरत होते. या कंपनीमार्फत संरक्षणविषयक सेवा दिली जाते.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप