कराड विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरू असल्याची माहिती अँबिशिएन्स एव्हीएशान फ्लाईंग क्लबचे संचालक परवेझ दमानिया यांनी दिली.
कराड : कराड विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरू असल्याची माहिती अँबिशिएन्स एव्हीएशान फ्लाईंग क्लबचे संचालक परवेझ दमानिया यांनी दिली. विमानतळ व्यवस्थापक कुणाल देसाई, प्रशिक्षण केंद्राचे पंकज पाटील आदी उपस्थित होते. परवेझ दमानिया म्हणाले की, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नुकतेच येथे नाईट लॅंडिंग यशस्वी झाले आहे.
कराड विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. या विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. हे ज्यादाची हवाई वाहतूक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे याचा वापर वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी सुरू करता येईल असा मानस होता. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षांचा करार सुध्दा करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठीची पाच विमाने विमानतळावर आणण्यात आली आहेत.
अजूनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन आसनी तर एक विमान चार आसनी आहे. यासाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला असून, नाईट लॅंडिंगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर या ठिकाणी राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. स्थानिकांसह देशभरातून सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या इथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनवण्यासाठी दोनशे तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाजगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार असल्याचा विश्वासही दमानिया यांनी दिला आहे.