लसीकरणामुळे करोना संक्रमणाची तीव्रती ही ६० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे IJMRच्या अभ्यासात सांगण्यात आले आहे
भारतात करोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयजेएमआर) प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आली आहे. गणिती मॉडेलच्या विश्लेषणावर आधारित, या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य उद्रेक कमी होईल.
या अभ्यासानंतर ४० टक्के लोकांनी दुसर्या लाटेच्या तीन महिन्यांतच दोन्ही डोस घेतले होते त्यानुसार हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लसीकरणामुळे करोना संक्रमणाची तीव्रती ही ६० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. लसीकरणामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचाओधोका कमी होणार आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
तिसऱ्या लाटेसंदर्भात चार गृहीतके विचारात घेता, अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की संसर्ग-आधारित प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होऊ शकते. विषाणूमध्ये कोणताही बदल झाला नाही तर आधी करोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा लागण होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत नवीन प्रकारचा विषाणूचा समावेश असू शकतो ज्यामुळे कोविड-१९चे मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊ शकते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्यासाठी हा विषाणू सक्षम आहे.
यंत्रणेच्या अभ्यासात तिसऱ्या लाटेमध्ये विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी लॉकडाउनची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. तसेच वेगवान लसीकरणामुळे भविष्यातील लाटा रोखण्यात यश येऊ शकते असे सांगण्यात आले आहे.
भविष्यातील संक्रमणाच्या लाटा टाळण्यासाठी तीन गोष्टींकडे महत्त्व देणे गरजेचे आहे
१) वैयक्तिक वर्तन आणि सामाजिक घटक: गर्दी, मास्कचा वापर आणि बोलताना शारीरिक राखणे अंतर हे सर्व मुख्य घटक आहेत ज्यामुळे करोना संक्रमणाचा दर आटोक्यात येऊ शकतो. मास्क वापर आणि शारीरिक अंतर यासारख्या इतर साध्या गोष्टींचा वापर न केल्यास पुढे येणाऱ्या अनेक लाटांसाठी हे कारणीभूत ठरू शकते.
२) आरोग्य यंत्रणा: कोणत्याही लॉकडाऊन आणि प्राथमिक उपायांचा प्रभाव हा आरोग्य प्रणालीवर गंभीरपणे अवलंबून असेल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेचे परिणाम पाहून उत्तरेकडील राज्यांनी लवकर लॉकडाऊन लावले.
३) जैविक घटकः विषाणूच्या संक्रमणाव्यतिरिक्त सार्स-कोव्ह -२ विषाणूची प्रतिकारशक्तीमुळे अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष वेधले जाते. लसीकरणाच्या प्रभावाबाबत ब्रिटनकडून मिळालेल्या माहितीवरुन असे दिसून येते की ऑक्सफोर्ड- अॅस्ट्राझेनेका लसीच्या एका डोसमुळे B.1.617.2. विषाणूची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे दिसून आले. तर दुसरा डोस अधिक परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेगवान लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखता येऊ शकतो असे म्हटले आहे.
दरम्यान, पहिल्या लाटेच्या तुलनेत करोनाच्या दुसर्या लाटेचा भारतामध्ये जास्त प्रभाव जाणवला. AIIMS प्रमुखांसह अनेक तज्ज्ञांनी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतात करोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते असे म्हटले आहे. डेल्टा प्लस विषाणूमुळे ही लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारखे उपाय करण्यास सांगितले आहे.