लष्कराचा हा कार्यक्रम करोनाच्या नियमांचे पालन कसे करता येते हे दर्शविणारा ठरला
नाशिक : करोनाशी संबंधित नियमांकडे बाजारपेठा, राजकीय वा तत्सम कार्यक्रमांत सर्रास दुर्लक्ष केले जात असताना गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन स्कूलचा दीक्षांत सोहळा या नियमांचे कठोर लष्करी शिस्तीत पालन करत पार पाडला. एरवी दीक्षांत सोहळा म्हणजे हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके, युद्धावेळी केली जाणारी कार्यवाही आदींनी भारलेला असतो. करोना काळात हवाई कसरती रद्द करण्यात आल्या. शिवाय, प्रशिक्षणार्थीच्या कुटुंबीयांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. मोजक्या लष्करी अधिकारी, जवानांच्या उपस्थितीत ३३ वैमानिकांना लष्करी हवाई दलात दाखल करण्यात आले.
मंगळवारी गांधीनगर येथील एव्हिएशन स्कूलच्या धावपट्टीवर आर्मी एव्हिएशनचे निर्देशक मेजर जनरल अजय सुरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्र म पार पडला. करोना काळात लष्करी हद्दीबाहेर होणारे कार्यक्रम आणि लष्कराचा कार्यक्रम यातील फरक ठळकपणे अधोरेखीत झाला.
लष्कराचा हा कार्यक्रम करोनाच्या नियमांचे पालन कसे करता येते हे दर्शविणारा ठरला. एरवी दीक्षांत सोहळ्यास प्रशिक्षणार्थीचे कुटुंबीय आवर्जुन उपस्थित असतात. गर्दी टाळण्यासाठी यंदा त्यांना उपस्थित राहू न देण्याची सूचना केली गेली. या सोहळ्यात लष्करी हवाई दलाच्यावतीने हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर होतात. हे दल युद्धासह अन्य काळात कसे कार्यरत असते याची प्रात्यक्षिके दर्शविली जातात. कार्यक्रम पत्रिकेतून तो भाग वगळला गेला.
मैदानावरील आसन व्यवस्था सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले जाईल, हा विचार करून करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे सुरी यांचे सकाळी बग्गीतून आगमन झाले. मैदानावरील प्रत्येक जण मुखपट्टी परिधान केलेला होता. दीक्षांत सोहळ्यात ३३ प्रशिक्षणार्थीचा समावेश होता. मुखपट्टी परिधान केलेले हे वैमानिक संचलन करत मैदानावर दाखल झाले. एरवी लष्करी बँड पथक लयबद्ध धून सादर करते. पण, तो मोह कार्यक्रमात टाळला गेला.
प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन संतोष कुमार सौरापल्ली यांना सिल्व्हर चित्ता या मानाच्या चषकाने सन्मानित करण्यात आले. हवाई उड्डाणात उत्कृष्ट गटात कॅप्टन तारीफ सिंह, मैदानी खेळ, विषयात कॅप्टन प्रभु देवन, पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमात कॅप्टन सचिन गुलिया, उत्कृष्ट गनरी म्हणून कॅप्टन दिवाकर ब्रम्हचारी यांना सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना अंतराचे पथ्य पाळून ‘एव्हिएशन विंग’ने सन्मानित करण्यात आले. सुरी यांनी मार्गदर्शन केले. कठोर लष्करी शिस्तीत करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.