२६ ते २८ मार्च या कालावधीत येथील गोखले शिक्षण संस्थेच्या मैदानात संमेलन होणार होते.
नाशिक : करोना संसर्गामुळे नियोजन दोलायमान अवस्थेत असलेले ९४ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिल्यास नोव्हेंबरमध्ये होऊ शकेल, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
याआधी २६ ते २८ मार्च या कालावधीत येथील गोखले शिक्षण संस्थेच्या मैदानात संमेलन होणार होते. त्याचवेळी राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने करोना स्थितीचा आढावा घेऊन संमेलनाचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. काही दिवसांपासून करोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने संमेलनाच्या आयोजनाविषयी संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ यांची संमेलन निमंत्रक संस्था लोकहितवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. भुजबळ यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांनी संमेलनाचे आयोजन कसे करता येईल, याविषयी चर्चा झाल्याचे सांगितले. करोना रुग्णसंख्या कमी होत आहे.
मंदिरे, महाविद्यालय सुरू झाले. अशा स्थितीत संमेलन घेण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये संमेलन घेता येऊ शकेल काय, या अनुंषगाने तयारीला सुरुवात करण्याची सूचना करण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत करोना रुग्णसंख्या नियंत्रणात न राहिल्यास जानेवारीत संमेलनाचे आयोजन करण्याविषयीही चर्चा झाली असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले.