करोना लसीच्या ४३ हजार ४४० कुप्या

पहिल्या फेरीत ३० हजार ६१५ आरोग्यसेवकांचे लसीकरण

नाशिक : करोना लसीकरणासाठी जिल्ह्यास ४३ हजार ४४० कुप्या उपलब्ध झाल्या असून बुधवारी त्यांचे दोन ते आठ अंश तापमान राखून वितरण सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील नोंदणी झालेल्या ३० हजार ६१५ सेवकांचे १६ जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. १६ केंद्रात ही प्रक्रिया पार पडेल. पुरेशा प्रमाणात कुप्या उपलब्ध झाल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. करोना लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची तयारी करण्यात आली. मध्यंतरी लसीकरण सराव चाचणी पार पडली. पुण्याच्या सिरम संस्थेच्या ‘कोविशिल्ड’ लसच्या कुप्या बुधवारी आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त झाल्या. लगेचच त्याच्या वितरणास सुरूवात झाली. शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना नियोजित तापमान राखून ते वितरित करण्यात आले. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या लसींचे दोन डोस काही विशिष्ट दिवसांच्या अंतराने घ्यावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात १८ हजार १३५ शासकीय आरोग्य कर्मचारी आणि १२ हजार ४८० खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरण प्रक्रियेसाठी १०२९ लसटोचकांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील १६ केंद्रांना मान्यता देण्यात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

प्रत्येक लसीकरण केंद्रात डॉक्टर, लसटोचक, परिचारिका, पोलीस कर्मचारी आदींचे पथक असेल. लसीकरणासाठी निवड झालेल्यांना एक तास आधी केंद्रात यावे लागेल. दररोज १० वाजता लसीकरणास सुरूवात होईल.

यासाठी प्रत्येक केंद्रात लसीकरणासाठी प्रतीक्षालय, लसीकरण आणि निरीक्षण यासाठी तीन स्वतंत्र कक्ष असतील. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळून ही प्रक्रिया पार पडेल. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीस अर्धा तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाईल. यासंबंधीचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. लसीच्या कुप्यांबरोबर सुईचेही वाटप करण्यात आले. लसीकरणात वापरली जाणारी सुई खास प्रकारची आहे. एकदा वापरल्यानंतर ती पुन्हा वापरता येणार नाही. डोसचे प्रमाण कमी जास्त होणार नाही याची दक्षता ती घेईल, अशी तिची रचना आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

विभागासाठी एक लाख ३१ हजार ८९० कुप्या

करोना लसीकरणासाठी नाशिक विभागात तब्बल एक लाख ३१ हजार ८९० कुप्या आणि आठ लाख सुई प्राप्त झाल्या असून त्यांचे वितरण सुरू करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात ४३ हजार ४४०, नंदुरबार जिल्ह्यात १२ हजार ४१०, धुळे जिल्ह्यात १२ हजार ४३०, जळगाव २४ हजार ३२० आणि नगर जिल्ह्यात ३९ हजार २९० कुप्या दिल्या जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी सांगितले. लसींच्या तुलनेत सुईंची संख्या मोठी आहे. नियमित लसीकरणासाठी त्या नेहमीच लागतात. तसेच करोना लसीकरणात दुसरा डोसही काही दिवसात द्यावा लागणार आहे. या अनुषंगाने लसीसोबत त्यांचे वितरण करण्यात आल्याचे डॉ. गांडाळ यांनी सांगितले. नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबारच्या कुप्यांचे वितरण नाशिकमधून करण्यात आले. नगर जिल्ह्यास पुण्याहून कुप्या येणार असल्याचे सांगण्यात आले. नंदुरबारसह अन्य जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी नाशिकमधून लसीच्या कुप्या नेण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

या ठिकाणी होणार लसीकरण

पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कमचाऱ्यांच्या लसीकरणासाठी १६ लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, मालेगावचे सामान्य रुग्णालय, कळवण, निफाड, चांदवड, येवला येथील उपजिल्हा रुग्णालय, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय, सय्यद पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरात इंदिरा गांधी रुग्णालय, महापालिकेचे सातपूर, नवीन बिटको आणि मालेगाव शहरातील सोयगाव, रमजानपुरा, कॅम्प येथील केंद्रात लसीकरण होईल.