विपणन क्षमतेवर परिणाम, विक्री आणि कर्जाची परतफेड आदी समस्या
विपणन क्षमतेवर परिणाम, विक्री आणि कर्जाची परतफेड आदी समस्या
नाशिक : करोना संसर्ग दिवसागणिक वाढत असताना अनेकांच्या हातातील रोजगार गेला आहे. यामुळे वेगवेगळे क्षेत्र बाधित होत असतांना बचत गटही यास अपवाद राहिले नाही. वर्षभरापासून बचत गटाला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. करोना काळात बचत गटांच्या उत्पादन नव्हे, तर विपणन क्षमतेवर विपरीत परिणाम झाल्याने विक्री आणि कर्जाची परतफेड असे प्रश्न गटांसमोर आहेत.
मागील वर्षी करोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. करोनामुळे लागु झालेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र ठप्प झाले. यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. वेगवेगळे क्षेत्र यात बाधित झाले असतांना बचत गटही अपवाद राहिले नाही. मागील वर्षभरापासून बचत गटांचे सर्व उपक्रम थांबले आहेत. बाहेर जा-ये करण्यावर र्निबध आहेत, बहुतांश घरांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असल्याने महिला आजारी माणसांच्या सेवेत गुंतल्या असताना वेगळा असा वेळ बचत गटाच्या कामाला दिला जात नाही. गटाने काही उत्पादन तयार केले तर त्याची विक्री करायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्षभरात बचत गटाच्या केवळ ऑनलाइन बैठका सुरू आहेत. ऑनलाइन प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. अंतर्गत कर्ज प्रक्रिया सुरू आहे. शहरी भागात काम ठप्प असतांना ग्रामीण भागात रोजंदारीवर जात कर्जाचे हप्ते सोडवित असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी गायकवाड यांनी सांगितले.
बचत गटाच्या उत्पादन क्षमतेवर नव्हे तर, विक्रीवर परिणाम झाला आहे. ग्राहक अनभिज्ञ असल्याने ऑनलाइन विपणनला प्रतिसाद मिळत नाही. सध्या कर्ज वाटप सुरू आहे. काही ठिकाणी महिलांना हप्ते भरण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाइन प्रशिक्षण सुरू असले तरी झुम मिटिंगवर वेळेची मर्यादा असल्याने मार्गदर्शन करतांना अडचणी येतात. महिलांना ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व माहिती देता येत नाही. त्यावर काही अंशी बंधने येत असल्याचे कल्याणी संस्थेच्या अश्विनी बोरस्ते म्हणाल्या.
करोनामुळे घरातील काम, कुटुंबातील कोणी बाधित असेल तर काम करतांना अडचणी येत आहेत. या सर्वाचा विचार शासनाने विचार करुन पुढाकार घ्यावा. राजकीय दौरे बंद करत ठोस पर्यायांची अमलबजावणी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली.
दरम्यान, काही सामाजिक संस्थांची ढाल पुढे करत महिलांना बचत गट बांधणीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. गटाची नोंदणी, पंतप्रधान विमा अशी वेगवेगळी कारणे पुढे करत गटाची बांधणी करण्यात येत आहे. टाळेबंदीचे कारण पुढे करत बँकांकडून खाते उघडण्यात अडचणी आणल्या जात असल्याचा तक्रोरी महिलांनी के ल्या.