कित्येक वर्षांपासून कळवणकरांनी बघितलेले छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे.
लोकवर्गणीतून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा
कळवण : कित्येक वर्षांपासून कळवणकरांनी बघितलेले छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. शासनाच्या कला संचालनालयाने परवानगी दिल्यामुळे येथे लोकवर्गणीतून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच पुतळा असलेले शिवस्मारक उभारण्यात येणार असून तीन फेब्रुवारी रोजी त्याचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली. तालुक्याच्या शिरपेचात छत्रपतींच्या या स्मारकामुळे मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीने संपूर्ण तालुक्यास भूमिपूजनाचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे गावागावात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा, यासाठी कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यश आले असून अश्वारूढ पुतळा उभारण्यास महाराष्ट्र शासनाचे कलासंचालनालय आणि मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांनी परवानगी दिली आहे.
सुमारे तीन कोटी रुपये खर्च असलेल्या या शिवस्मारकासाठी नगरपंचायतीने शहराच्या मध्यवर्ती भागात अंबिका चौकात अर्धा एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. लोकवर्गणीतून शिवस्मारक आकार घेणार आहे. यामध्ये साधारण सव्वा कोटीच्या दरम्यान किंमत असलेल्या अश्वारूढ पुतळय़ाला तयार करण्याचे काम विख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या दिल्ली येथील स्टुडिओत एक महिन्यापासून सुरू आहे. साधारण एप्रिलच्या सुरुवातीस हा पुतळा कळवणकरांना मिळणार आहे. स्मारकाच्या चारही बाजूला बगिचा करून सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे.
स्मारकाची वैशिष्टय़े
२१ फूट उंचीचा पुतळा, १७ फूट लांबी, १५ फूट रुंदी, सात टन वजन, चबुतरा १८ फूट उंच, २५ लांब, १५ फूट रुंद. अर्धा एकर जागेवर हे स्मारक होणार असून या संपूर्ण स्मारकासाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आदिवासीबहुल तालुक्यात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण होणार आहे. यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. लोकवर्गणीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे शिवस्मारक कळवणच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. सर्वानी या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी या सोहळय़ात सहभागी व्हावे व आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी.
-भूषण पगार (अध्यक्ष, कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती)