कांदा दरात वाढ; बाजार समितीत १३ हजार ९२९ क्विंटल आवक

रविवारची साप्ताहिक सुट्टी व सोमवारी राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदमुळे सलग दोन दिवस जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद होते.

बाजार समितीत १३ हजार ९२९ क्विंटल आवक

नाशिक : दोन दिवसानंतर मंगळवारी उघडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढूनही दर मात्र चढतेच राहिले. लासलगाव बाजार समितीत शनिवारच्या तुलनेत क्विटंलच्या दरात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ३७५० रुपयांवर पोहोचले. मनमाडसह इतर बाजार समित्यांमध्ये हेच चित्र होते.

रविवारची साप्ताहिक सुट्टी व सोमवारी राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदमुळे सलग दोन दिवस जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद होते. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत १३ हजार ९२९ क्विटंल कांद्याची आवक झाली. त्यात नवीन लाल कांद्याचे प्रमाण केवळ २२५ क्विटंल होते. उन्हाळ कांद्यास सरासरी ३७५० रुपये दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत दरात ३०० रुपयांनी वाढ झाली.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मंगळवारी उन्हाळ कांद्याचे भाव ३७०० रूपये क्विंटल होते. आदल्या दिवशीच्या बंदमुळे या दिवशी ३६२ ट्रॅक्टर इतकी कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी ३७०० रूपये क्विंटल असे दर मिळाला. दोन दिवसांपूर्वी हे भाव सरासरी ३२०० रूपये क्विटंल होते.

दरम्यान, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस दसरा सणानिमित्त  झेंडूच्या फुलांचे लिलाव होणार आहेत. फुलांची प्रतवारी करून विक्रीस आणावे. लिलाव उघड पध्दतीने होईल. यामुळे मालाला योग्य भाव मिळेल. शेतकरी बांधवांनी आपली झेंडुची फुले बाजार समितीत विक्रीस आणावी असे आवाहन करण्यात आले आहे.