मुलांचा उत्साह शीगेला
मुलांचा उत्साह शीगेला
नाशिक : शहरात पतंगप्रेमींचा उत्साह शीगेला पोहचला असून संक्रोंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगबेरंगी पतंगांनी अवकाशात गर्दी के ली. संक्रोंतीच्या दिवशी त्यात अधिकच वाढ होणार असल्याचे शहरातील पतंग विक्र ेत्यांकडे होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीवरून दिसून आले. विविध प्रकारच्या पतंगी बाजारात असल्या तरी कागदी पतंगांना सर्वाधिक मागणी आहे. आपली हौस एखाद्याच्या जिवावर बेतू नये यासाठी पतंगप्रेमीनी नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महिला वर्गानेही मकरसंक्रोंतीच्या पूजाविधीकरिता सामान खरेदीसाठी बाजारात गर्दी के ली.
संक्रोंत आणि पतंग हे समीकरण दृढ आहे. मकरसंक्रोंतीच्या निमित्ताने पतंगोत्सवाची मजा लुटण्यासाठी पतंगप्रेमी सज्ज झाले आहेत. पतंगप्रेमींसाठी वेगवेगळ्या आकारातील कागदी तसेच प्लास्टिकचे पतंग बाजारात दाखल झाले आहेत. अभिनेत्रींचे फोटो, कार्टुन्सच्या छबी पतंगावर आहेत. साधारणत: दोन रुपयांपासून ३०, ५०, १०० रुपये असे दर आहेत. प्लास्टिक, मेटल, मार्बल अशा वेगवेगळ्या प्रकारात पतंग उपलब्ध असले तरी कागदी पतंगीला अधिक मागणी आहे. यंदा संक्रोंतीवर करोनाचे सावट असले तरी खरेदीचा उत्साह तसूभर कमी झालेला नसल्याचे दिलीप पतंग सेंटरचे दिलीप सोनवणे यांनी सांगितले.
यंदा चिनी पतंगी तसेच मांजावर बंदी आणली आहे. यामुळे पतंगप्रेमींचा हिरमोड झाला आहे. नायलॉन मांजामुळे पतंग काटाकाटीला मजा येत असला तरी या मांजामुळे पक्षी आणि जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रीवर निर्बंध लादत विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पालकांनीही आपला मुलगा पतंग उडविण्यासाठी कोणत्या मांजाचा उपयोग करत आहे, हे पाहण्याची गरज आहे. महावितरणकडूनही पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काटलेला पतंग विद्युत तारांमध्ये अडकल्यास तो काढण्यासाठी मुलांकडून लोखंडी पाइपचाही वापर करण्यात येतो. त्यामुळे विजेचा धक्का बसून दुर्घटना होण्याचा धोका असतो. रस्त्यावरील वाहतुकीची पर्वा न करता
काटलेला पतंग घेण्यासाठी मुले धावत असतात. त्यामुळे ते अपघाताला निमंत्रण देत असतात. मुलांनी उत्साहाला आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
येवला येथील संक्रोंत आणि पंतगोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. यंदा मात्र करोनामुळे तेथील पतंगोत्सवाचा रंग फिका आहे. मागील वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे आसाम, ओडिशामधून येणाऱ्या बांबूच्या काडय़ा मिळत नसल्यामुळे पतंग निर्मितीवर मर्यादा आल्याची माहिती येवला येथील पतंग विक्र ेते गणेश गुजराती यांनी दिली. संक्रोंतीच्या पूर्वसंध्येलाच बऱ्याच दुकानातील माल संपल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, महिला वर्गाकडून संक्रोंतीची पूजा करण्यासाठी मातीच्या बोळक्यांसह अन्य सामान खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागासह अन्य बाजारपेठेत गर्दी झाली.