“कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल”, दिशा रवीच्या अटकेवरुन शशी थरुर यांनी साधला निशाणा

दिशा रवीच्या अटकेचा केला तीव्र विरोध

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बेंगळुरू येथून अटक करण्यात आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. रविवारी पतियाळा हाऊस कोर्टात तिला हजर केले असता कोर्टाने ५ दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, दिशाच्या अटकेवरुन राजकारण तापायला सुरूवात झाली असून तिच्या अटकेचा विरोध होत आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिशाच्या त्वरित सुटकेची मागणी केली आहे. तर, काँग्रेसचे नेता शशी थरुर यांनीही दिशाच्या अटकेचा विरोध केलाय. “कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत, तर दहशतवादी जामिनावर बाहेर” अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.शशी थरूर यांनी जम्मू-काश्मिरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबतच दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. देविंदर सिंह सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे दोन फोटो शेअर करताना, “कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत, तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर….आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?… उत्तर खालच्या दोन शिर्षकांमध्ये मिळेल…असं ट्विट करत थरुर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.दरम्यान, स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’च्या अधिकाऱ्यांनी दिशा रवी हिला तिच्या घरातून प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ तयार करण्यात आणि ते प्रसारित करण्यात तिचा सहभाग  असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. दिशा रवी हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. दिशाचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यातून ‘टूलकिट’ प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि दिशा कोणाच्या संपर्कात होती याची माहिती मिळू शकेल, असा पोलिसांचा कयास आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी मोर्चाच्या वेळी स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने कथित ‘टूलकिट’ आपल्या ट्विटर खात्यावर प्रसारित केले होते. परंतु नंतर तिने ते काढून टाकले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’चे संपादन दिशा हिने केले होते. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात तिचा मोठा वाटा होता. ‘टूलकिट’बाबतचे हे प्रकरण गुन्हेगारी कटाचा भाग मानले जात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गूगलच्या मदतीने ‘गुगल टूलकिट’ टाकणाऱ्यांचा ‘आयपी’ पत्ता शोधला होता. त्यातून दिशाचा थांग लावण्यात आला.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाचे कथित ‘टूलकिट’ ट्विटरवर प्रसारित केले होते. त्यानंतर तिने शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले होते. दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने ४ फेब्रुवारीला ‘टूलकिट’निर्मात्या अनोळखी कथित खलिस्तान समर्थकांविरोधात भारत सरकारविरुद्ध सामाजिक, सास्कृतिक आणि आर्थिक युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हेगारी कट, देशद्रोह यांसह अनेक कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचले का?  पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ग्रेटा थनबर्ग, प्रख्यात पॉप गायिका रिहाना यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय वलयांकित व्यक्तींनी समाजमाध्यमांद्वारे या आंदोलनाकडे लक्ष वेधले होते, तर काहींनी पाठिंबा दिला होता.

प्रकरण काय?

  • १९ वर्षीय स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ट्विटरवर आंदोलनाबाबतचे ‘टूलकिट’ प्रसारित केले होते. ते तिने नंतर हटवले.
  • या ‘टूलकिट’मधील माहिती ‘पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ या खलिस्तान समर्थक गटाशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले होते.
  • पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘टूलकिट’मध्ये सामाजिक माध्यमांवर हॅशटॅग चालवून डिजिटल हल्ला करण्याबाबतची रणनीती होती.
  • टूलकिट’मधील माहितीनुसार २६ जानेवारीला किंवा त्याआधी ‘हॅशटॅग’ हल्ल्याचे नियोजन होते.
  • २३ जानेवारीला ट्वीट मोहीम , २६ जानेवारीला प्रत्यक्ष आंदोलनाची कृती म्हणजे दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी मोर्चात सामील होणे आणि नंतर दिल्ली सीमांवर माघारी फिरणे.
हे वाचले का?  Jammu-Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी

’सरकारविरोधात असंतोष, द्वेष निर्माण करणे आणि भिन्न सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक समूहांमध्ये विद्वेष पसरवणे हा ‘टूलकिट’चा हेतू होता, असे पोलिसांनी म्हटले होते.

दिशा रवी कोण?

दिशा बेंगळूरुमध्ये राहत होती. तिने एका खासगी महाविद्यालयातून ‘उद्योग प्रशासन’ या विषयात पदवी संपादन केली आहे. ‘फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया’ या संघटनेची ती संस्थापक सदस्य असून, पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे.