कालिदास कलामंदिरात रविवारी ‘होय मी सावरकर बोलतोय’!

‘सागरा प्राण तळमळला’च्या शतकोत्तर एकादशपूर्तीनिमित्त

‘सागरा प्राण तळमळला’च्या शतकोत्तर एकादशपूर्तीनिमित्त

नाशिक : टाळेबंदीनंतर प्रेक्षकांनी नाटकाकडे पुन्हा वळावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय विचार लोकांपर्यंत पोहचावेत या दुहेरी हेतूंसाठी ‘सागरा प्राण तळमळला’ च्या शतकोत्तर एकादशपूर्तीनिमित्त ‘होय, मी सावरकर बोलतोय’ या नाटकाचा स्वेच्छा मूल्य प्रयोग येथील महाकवी कालिदास कलामंदिरात १० जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील ‘अभिजात प्रॉडक्शन्स’ या संस्थेच्या वतीने हा नाटय़प्रयोग होणार आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाशिक या जन्मभूमीत हे नाटक प्रेक्षकांनी विनामूल्य पहावे आणि प्रयोगानंतर ज्यांची इच्छा असेल त्यांनी योग्य वाटतील ते पैसे द्यावेत, अशी निर्माते आणि कलाकार आकाश भडसावळे यांची इच्छा आहे. यापूर्वीही काही नाटकांचे असे प्रयोग आपल्याकडे झाले आहेत; परंतु, टाळेबंदीनंतरच्या अशा आणीबाणीच्या काळात अभिजात संस्थेने उचललेले पाऊल खरं तर महत्त्वाचं म्हणता येईल. यासंदर्भात भडसावळे यांनी आपली भू्मिका मांडली. मुळात काही दोन, चार नामांकित संस्था आणि त्यांची नाटके वगळता टाळेबंदीपूर्वीही नाटकांना काही फार प्रेक्षक वर्ग होता असे नाही. नाटय़ व्यवसायापेक्षा नाटय़ कला जिवंत राहावी, असे वाटते. त्यामुळे ‘व्यवसाय’ हा शब्द बाजूला काढून निव्वळ ‘नाटक करायचं’ या उद्देशाने आम्हा सगळ्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. असे असले तरीही आर्थिक बाजूचा विचार छोटय़ा निर्मात्याला करावाच लागतो. जेव्हा नाटकाला प्रेक्षक नसल्याची ओरड आम्ही सगळे करतो; तेव्हा अशा विचित्र परिस्थितीत नाटक उभे राहावे आणि प्रेक्षकांना नाटकाला खेचून आणावे या दोहोंच्या उद्देशातून पुन्हा एकदा सावरकरांवरील नाटक करून ‘स्वेच्छा मूल्य’ संकल्पना मांडण्याचा विचार डोक्यात आला. आमचा सावरकर नाटकाचा संपूर्ण चमू याही स्थितीत पाठीशी राहिला.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

आज त्यांच्यामुळेच असे धाडस करण्याचं बळ येतं. सावरकर नाटकाला खरं तर निमित्ताची आवश्यकता नाही. परंतु, तरीही एक सुरेख योगायोग जुळून आला तो ‘सागरा प्राण तळमळला’च्या शतकोत्तर एकादश पूर्तीचा. मुंबई, पुण्यात आणि त्यानंतर इतरत्र असे प्रयोग करण्याचा मानस आहे. नाटक व्यवसाय पूर्ववत होईपर्यंत आम्ही असे प्रयोग करत राहू, असे भडसावळे यांनी नमूद केले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

नाटकात बहार भिडे, सचिन घोडेस्वार, नरेंद्र कुलकर्णी, कविता नाईक, सुमित चौधरी, प्रसाद संगीत आणि आकाश भडसावळे हे कलाकार आहेत.