कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
नाशिक : प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते आशुतोष गोवारीकर, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन अर्थात एमकेसीएलची स्थापना करणारे विवेक सावंत, भरतनाट्यम क्षेत्रातील गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह सहा जणांना येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय स्तरावरील ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
मंगळवारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, अजय निकम, कार्यवाह मकरंद हिंगणे, गुरूमित बग्गा यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रतिष्ठानतर्फे १९९२ पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा हा १७ वा पुरस्कार आहे. लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.
ज्ञान क्षेत्रासाठी तंत्रज्ञान व नेटवर्किंग क्षेत्रात शिक्षणक्रांती घडविणाऱ्या विवेक सावंत यांची निवड करण्यात आली. डॉ. विजय भटकर यांच्या सीडॅक संस्थेत प्रगत संगणक प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. नृत्यसाठी भरतनाट्यम नृत्यशैलीतील कलावंत, अभ्यासक डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी तंजावर येथील भोसले राजांच्या नृत्यविषयक मराठी प्रबंध कवन रचनांवर संशोधन केले आहे. लोकसेवेसाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक डॉ. शमसुद्दीन तांबोळी तर क्रीडा क्षेत्रासाठी पत्रकार सुनंदन लेले यांची निवड करण्यात आली. अप्रतिम कलाकृतींद्वारे मान्यता मिळालेल्या प्रमोद कांबळे यांना शिल्प-चित्र गटात पुरस्कार दिला जाणार आहे. चित्रपटसाठी उत्कृष्ट कला निर्मितीचा ध्यास असणारे दिग्दर्शक व निर्माता आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली.
कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.