केंद्राचे पीक पाहणी पथक मालेगाव तालुक्यात, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली नाराजी

शेतकर्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी केली. खरीप हंगाम उलटून आता रब्बी हंगाम सुरु झाला आहे.

मालेगाव : पावसाने दडी मारल्याने यंदा बाजरी, मका, कपाशी यांसह इतर उभी पिके जळून गेली. दुसरीकडे पाळीव जनावरांना चारा नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यातच पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे साहेब, अशा दुष्काळी परिस्थितीत कसे जगायचे, अशी व्यथा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे मांडली. शेतकर्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी केली. खरीप हंगाम उलटून आता रब्बी हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने याआधीच नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणे अपेक्षित होते, अशी संतप्त भावनाही काहींनी व्यक्त केली.

केंद्र सरकारचे पथक राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बुधवारी आले. केंद्रीय कृषी सचिव प्रिया रंजन, डॉ. ए. एल. वाघमारे, डॉ. सुनील दुबे, चिराग भाटिया या अधिकार्यांच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

यावेळी शेतकर्यांनी आपली व्यथा मांडली. पथकाने सौंदाणे ग्रामपंचायतीत शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवस आधीच येणे आवश्यक होते, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुंगसे, चंदनपुरी, लोणवाडे, दसाणे, चिखलओहळ, गिरणा धरण या गावातील शेतकर्यांच्या बांधावर पथक गेले. नुकसानग्रस्त मका, कपाशी, बाजरी, कपाशी, डाळिंब पिकांची पाहणी केली. विहिरीतील पाणी पातळी, गिरणा धरणातील पाण्याची स्थिती, याचा आढावा घेतला. दुष्काळामुळे शेतकर्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतात काहीच शिल्लक राहिले नाही. जनावरांसाठी चारा नाही, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. काही पिकांची कापणी परवडत नव्हती. त्यामुळे ती तशीच सोडून दिली होती. ती देखील दाखवण्यात आली. यावेळी पथकाला काही ठिकाणी हिरवळ दिसल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना ती रब्बी पिके असल्याचे निदर्शनास आणून दिले.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

खरीप पिकांच्या उत्पादनात ५० ते ८० टक्के घट पावसाअभावी दुष्काळ जाहीर झालेल्या मालेगाव, सिन्नर आणि येवला या तीन तालुक्यांत मका, सोयाबीन, बाजरी या मुख्य पिकांसह अन्य खरीप पिकांचे महसूल मंडळनिहाय ५० ते ८० टक्के उत्पन्नात घट झाली आहे. त्याचा अहवाल कृषी विभागाने पथकाला सादर केला असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले. गुरुवारी पथक सिन्नर आणि येवला या दुष्काळी तालुक्यात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे अवलोकन करणार आहेत.