केवळ आश्वासने नकोत, कृती करा!; बाल वेठबिगारीसंदर्भात इगतपुरीतील आदिवासींची राजकारण्यांकडून अपेक्षा

इगतपुरी तालुक्यातील उभाडे या आदिवासी पाडय़ावरील १० वर्षांच्या मुलीचा वेठबिगारीमुळे मृत्यू झाल्यानंतर बाल वेठबिगारीच्या जाळय़ात तालुक्यातील अनेक जण सापडल्याचे वास्तव पुढे आले.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील उभाडे या आदिवासी पाडय़ावरील १० वर्षांच्या मुलीचा वेठबिगारीमुळे मृत्यू झाल्यानंतर बाल वेठबिगारीच्या जाळय़ात तालुक्यातील अनेक जण सापडल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे राजकीय मंडळींची उभाडे येथे ये-जा सुरू झाली आहे. आदिवासी विकास विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसताना राजकीय मंडळींकडून आश्वासनांचा पाऊस पडत आहे. आदिवासी बांधवांनी आश्वासनांपेक्षा ठोस कृती करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील १८ पेक्षा अधिक मुलांची वेठबिगार म्हणून पालकांकडूनच विक्री करण्यात आल्याचे वास्तव उघड झाले. त्यातील आठ जणांची सुटका करण्यात आली; परंतु १० वर्षांच्या गौरी आगिवले या मुलीला छळामुळे जीव गमवावा लागला. या घटनेची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाला काही सूचना केल्या. त्यात अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे कोणी समाजकंटक नियोजनबद्ध काम करत आहेत काय, याचा तपास करण्यात यावा, आदिवासी भागात पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आदिवासी कुटुंबांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य सल्लागार समितीच्या वतीने राज्यातील आदिवासी कुटुंबांचा रोजगार, शिक्षण, कृषी विकास आदी मुद्दय़ांसंदर्भात विचार करण्यात यावा, अशा सूचनांचा समावेश आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

विभागाकडून ठोस कृती नाही

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले असतानाही अद्याप आदिवासी विकास विभागाच्या वतीने कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शनिवारी उभाडे येथे गेले असता त्यांच्यासमवेत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ भेट देण्याचे सोपस्कार पार पाडले. दानवे यांनी अशा प्रकारच्या घटना समाजाला काळिमा फासणाऱ्या असल्याचे सांगितले. बालकामगारांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या चित्रा वाघ यांनीही आदिवासी वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.  

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

दरम्यान, या अशा राजकीय पर्यटनाला स्थानिक  कंटाळले असून ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. याविषयी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. घटना घडल्यानंतर लोक येथे येत आहेत. अशीच तत्परता आधी दाखवली असती तर, ही वेळच आली नसती. कातकरी समाजाच्या अडचणींविषयी याआधीही शासनाकडे पाठपुरावा केला आहे; परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाल वेठबिगारीविषयी पालक बोलण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सरकारी रुग्णालयातील जन्म-मृत्यूच्या नोंदी, तांडा, पाडानिहाय तपासल्या जात आहेत. तहसीलदारही आपल्या पातळीवर बालकांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत आठ मुलांची सुखरूप सुटका झाली असून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम

– सचिन पाटील ,पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा