केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा

शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वातंत्र्यसैनिक वसंत सीताराम केसरकर यांनादेखील शस्त्र जमा करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे

सावंतवाडी : निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सुमारे अडीचशे परवानाधारकांपैकी केवळ तेरा जणांना याबाबत नोटीसा देण्यात आल्या असून यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेही नाव आहे.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी काढलेल्या आदेशानुसार, जामिनावर मुक्तता झालेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि कोणत्याही वेळी, खास करून निवडणूक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेल्या व्यक्तींना शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तालुक्यातील १३ जणांची यादीमध्ये नावे असून सर्वात शेवटचे नाव दीपक केसरकर यांचे आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी शंका उपस्थित झाली आहे. एखाद्या दंगलीत समावेश होता, की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, की एखाद्या प्रकरणात जामीनावर मुक्तता झाल्यामुळे त्यांचे नाव यादीत आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मंत्री केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हे वाचले का?  BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजापा आमदाराची खदखद

स्वातंत्र्यसैनिक संतप्त

शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वातंत्र्यसैनिक वसंत सीताराम केसरकर यांनादेखील शस्त्र जमा करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. यावर त्यांनी ‘लोकसत्ता’कडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ही नोटीस चुकीची आहे. कोणत्याही न्यायालयात किंवा कोठेही आपल्याविरुद्ध प्रकरण प्रलंबित नाही. याबाबत आपण तात्काळ जाब विचारणार असल्याचे सीताराम केसरकर यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”