कोकण, विदर्भात वादळी पाऊस; खेडमध्ये वृक्षांची पडझड; नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी

उत्तर भागात संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

दापोली / अलिबाग / नागपूर : कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह विदर्भाच्या काही भागांत गुरुवारी वादळी वाऱ्यांसह वळिवाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. पावसामुळे आंब्यासह अन्य पिके तसेच वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पंचायत समितीसमोर महाकाय वृक्ष कोसळल्याने खेड-दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तासाभराच्या प्रयत्नांनंतर ती पूर्ववत करण्यात यश आले. या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या टेलिफोन एक्सचेंजजवळ आणि शहरातील स्वरूप नगर भागातही झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शहर परिसर आणि तालुक्यात मुसळधार वादळी पावसामुळे घरे-इमारतींवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने आंबा, उन्हाळी भातपिकाबरोबरच वीट भट्टी व्यवसायाला फटका बसला. माणगाव, गोरेगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. उत्तर भागात संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

उपराजधानी नागपूरच्या काही भागांमध्येही गुरुवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासूनच सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उन्ह, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण असा हवामानाचा खेळ सुरू आहे. गुरुवारी नागपूर शहरातील बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. अमरावती, यवतमाळ येथेही पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र ढगाळ वातावरण होते.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

धाराशिवमध्ये पावसाने नुकसान

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागांत गुरुवारी दुपारनंतर कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तुळजापूर आणि भूम तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. धाराशिव शहरात दुपारी बारानंतर गडगडाट सुरू झाला. जिल्ह्यातील अति जोरदार पावसाने फळपिकांचे नुकसान झाले. जनावरांच्या चाऱ्यांच्या गंजी उडूनही अनेक ठिकाणी दाणादाण झाली. आंब्याची झाडे, बाभळीची मोठमोठी झाडे उन्मळून पडली. धाराशिव शहरातील पाटबंधारे कार्यालयासमोर चारचाकीवर मोठे झाड पडले.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”