या निवडणुकीमध्ये भाजपाने सत्तारूढ गटाबरोबर राहणे पसंत केले आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा फैसला आता थोड्या वेळातच होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेने आव्हान दिले आहे. यापूर्वी सत्ताधारी गटाने सहा जागा जिंकल्या असल्या तरी उर्वरित १५ जागांवर कोण बाजी मारणार याचा निकाल तीन तासात लागणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना यांची सत्ता आहे. जागावाटपाची चर्चा फिसकटला नंतर शिवसेनेने स्वतंत्र आघाडी केली. तर भाजपाने सत्तारूढ गटाबरोबर राहणे पसंत केले. सत्तारूढ गटाचे नेतृत्व बँकेचे अध्यक्ष ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील , सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे करीत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी आव्हान दिले आहे. दोन्ही आघाडीने विजयाचे दावे केले आहेत.
सकाळी सातपासून रमणमळा भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली आहे. चाळीस टेबलवर मतमोजणी होत आहे प्रथम पहिल्या गटातील मतमोजणीला सुरुवात झालीय. सर्वात शेवटी मागासवर्गीय गटातील मतमोजणी केली जाणार आहे. तीन तासाच्या मतमोजणीनंतर बँकेचा सत्तेचा कौल स्पष्ट होईल.