खड्डेमय रस्त्यांमुळे १४ ठेकेदारांना नोटीस ; रस्ते दुरुस्तीला वेग

जुलैतील पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाताहात झाली. लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांवर इतके खड्डे पडले की त्याचा अंदाज येणे अवघड झाले.

नाशिक : पावसाने उघडीप घेतल्याने मनपाने खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग दिला आहे. डांबर, खडी टाकून खड्डे बुजवले जात असून नाशिकरोड, पाथर्डी भागात डांबर टाकून रस्ते दुरुस्ती प्रगतिपथावर आहे. नव्या रस्त्यांची बिकट स्थिती झाली. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते. रस्ता दुरुस्तीकडे कानाडोळा करणाऱ्या १४ ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जुलैतील पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाताहात झाली. लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांवर इतके खड्डे पडले की त्याचा अंदाज येणे अवघड झाले. खड्डेमय रस्त्यांमुळे सामान्यांमध्ये रोष वाढला. राजकीय पक्षांनी आंदोलनाचे सत्र सुरू केले. भर पावसात मनपाची यंत्रणा कार्यप्रवण झाली. शहरातील रस्त्यांवर सहा हजारहून अधिक खड्डे पडल्याचे खुद्द महापालिकेने म्हटले होते. मुख्य रस्त्यांसह कॉलनी रस्त्यांची चाळणी झाली आहे. एक, दोन वर्षांपूर्वी तयार झालेले नवीन रस्त्यांची वेगळी स्थिती नव्हती. या पार्श्वभूमीवर, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली जात आहे. रस्त्याची दुरुस्ती करताना दर्जाकडे लक्ष दिले जात असून कंत्राटदारांना तशी ताकीद दिली गेल्याचा दावा होत आहे. विभागातील एकूण १४ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

नाशिक पश्चिम विभागातील थत्ते नगर परिसरात खड्डे बुजविण्यात आले. याच विभागातील बारा बंगला हा जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेला रस्ता खडीकरणाद्वारे बुजवला गेला. पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३० मधील कलानगर, वडाळा, पाथर्डी रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले. कलानगर चौकात खड्डे बुजविण्यासाठी विशिष्ट मिश्रणाचा वापर करण्यात आला. मेट्रो झोन, गंगापूर रोड, गणेश नगर, वसंत मार्केट, नांदूर रस्ता आदी भागात हे काम प्रगतिपथावर आहे. तोफखाना केंद्र रस्त्यावर एमएनजीएलने गॅस वाहिनीसाठी खोदकाम केले होते. तिथे डांबर, खडीचा वापर करून खड्डे बुजविण्यात आल्याचे मनपाने म्हटले आहे

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम