खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू येथून कोणत्याही नव्या तुकडीला दक्षिण काश्मीरमधील गुंफा तळ शिबिरात येण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीटीआय, जम्मू : खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. जम्मू येथून कोणत्याही नव्या तुकडीला दक्षिण काश्मीरमधील गुंफा तळ शिबिरात येण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शुक्रवारी अमरनाथ गुंफेजवळ अतिवृष्टीमुळे अचानक आलेल्या पुरात १६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० लोक बेपत्ता झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, खराब हवामानामुळे जम्मू ते काश्मीरमधील पायथ्याच्या द्वियात्रातळांपर्यंतची अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कोणत्याही नव्या तुकडीला अमरनाथकडे जाण्याची सध्या परवानगी नाही. ४३ दिवस चालणाऱ्या या वार्षिक यात्रेला ३० जूनपासून दोन मार्गाद्वारे सुरुवात झाली.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमधील पहलगाम-नुनवानपासून ४८ किलोमीटरचा पारंपरिक मार्ग आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बलताल या अन्य एका मार्गाने ही यात्रा सुरू होती. आतापर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शनाचा लाभ घेतला आहे. ११ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या यात्रेची सांगता होणार आहे. २९ जूनपासून, जम्मूतील भगवतीनगर पायथ्याच्या यात्रा तळामधून एकूण ६९ हजार ५३५ यात्रेकरू दहा तुकडय़ांत रवाना झाले आहेत.