खासगी सुरक्षारक्षकांऐवजी संयोजकांची पोलिसांवर भिस्त

गोखले शिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग पकडला आहे

अनिकेत साठे

मार्च महिन्यात येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मोठय़ा संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असले, तरी संमेलनस्थळी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार नाही. या कामात पोलीस, गृहरक्षक दलाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. स्वयंसेवकांवर काही जबाबदारी सोपविण्याचा संयोजकांचा मानस आहे.

गोखले शिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग पकडला आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी यापूर्वी स्थापन झालेल्या ३९ समित्यांमध्ये चित्रकला-शिल्प या आणखी एका समितीची नव्याने भर पडली. या सर्व समिती प्रमुखांची पहिली बैठक नुकतीच पार पडली. प्रत्येकाच्या कार्याचा आढावा, त्यातील अडचणी आणि सूचनांवर विचारविनिमय करण्यात आला.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

संमेलनस्थळी मुख्य सभामंडप, अन्य कार्यक्रमांचे ठिकाण, ग्रंथप्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, भोजन व्यवस्था आदींचे नियोजन कसे असेल, यासंबंधीचा आराखडा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मांडला. हा आराखडा मान्यतेसाठी प्रशासनास सादर करण्यात आला आहे.

संमेलनात खासगी सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्यास मागणी नोंदविण्याकडे सुरक्षा समितीने बैठकीत लक्ष वेधले. तेव्हा संयोजकांनी खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संमेलनात पोलीस, गृहरक्षक दलाचे पूर्णत: सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षकांची गरज पडणार नाही. त्याऐवजी स्वयंसेवकांची मदत घेण्याचे सूतोवाच करण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

परंतु संमेलनासाठी स्वयंसेवक मिळणे अवघड झाले आहे. करोनाचे गडद होणारे सावट आणि संमेलनकाळात होणाऱ्या परीक्षा यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

संयोजकांनी काही महाविद्यालयांना पत्र देऊन स्वयंसेवक देण्याची मागणी केली. तथापि सध्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांवर तसे बंधनकारक करणे महाविद्यालयांना अवघड झाले आहे.

पदरमोड, निधी संकलनाविषयी नाराजी

वेगवेगळ्या समित्यांची जबाबदारी सांभाळणारे काही पदाधिकारी पदरमोड करून दैनंदिन कामे करीत आहे. या खर्चाची तजवीज कशी करायची, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक समित्यांनी आपल्या अंदाजित खर्चाची माहिती सादर केलेली नाही. ती प्रथम सादर करावी. तसेच दैनंदिन कामात जी बाब खर्चीक असेल, त्यासाठी अर्ज करून पूर्वसंमती घेण्याचे संयोजकांनी सुचविले आहे. निधी संकलनासाठी बरीच धडपड सुरू आहे. समितींच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: देणगी दिली आहे. त्यांना निधी संकलनासाठी देणगी पुस्तिका दिल्या आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना निधी संकलनाचा भार टाकला जात असल्याने काही जणांमध्ये नाराजीची भावना आहे.