गडकरींच्या दौऱ्यानिमित्त भाजपमधील विसंवाद उघड

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आपण ५०० कोटी रुपये मंजूर करून आणले. ठेकेदार नियुक्त झाला.

नगर : जिल्ह्यातील सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी (दि. २) नगरमध्ये येणार असल्याची माहिती भाजपचे खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान हीच माहिती कालच, बुधवारी  भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्यामुळे गडकरींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील विसंवाद  व कुरघोडय़ा उघड झाल्या. आमच्यामध्ये विसंगती निर्माण झाली आहे, असे सांगत खा. विखे यांनी ती मान्य करताना गंधे यांचा प्रधानमंत्री कार्यालय गडकरी यांच्याकडे थेट संबंध असावा, असा टोलाही लगावला.

शनिवारी सकाळी ११ वाजता येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

खा. विखे म्हणाले, गंधे यांनी पत्रकार परिषद कशाच्या आधारे व कधी घेतली, हे मला माहीत नाही, मात्र, आज दुपारी २ वा. सर्व कार्यक्रम गडकरी यांच्या कार्यालयाकडून अंतिम झाल्यानंतरच मी माहिती जाहीर करत आहे. गंधे यांचा बहुधा थेट पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असावा.

काल गंधे यांच्या समवेत पक्षाचे पदाधिकारी सुनील रामदासी, सचिन पारखे, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक आदी उपस्थित होते तर आज खा. विखे यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आपण ५०० कोटी रुपये मंजूर करून आणले. ठेकेदार नियुक्त झाला. त्याला कार्यारंभ आदेश दिला, परंतु त्याने काम न केल्याने महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ठेकेदार नेमला, परंतु त्यानेही काम केले नाही याबद्दल विखे यांनी हतबलता व्यक्त केली. कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गच्या ठेकेदारला निलंबित करण्याची मागणी आपण गडकरी यांच्याकडे शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात करणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.

जनताच त्यांना उत्तर देईल

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यापूर्वीही काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कर्जतमधील काहींनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्याचा काहीही लाभ राष्ट्रवादीला होणार नाही. येत्या जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकीत जनता त्याला उत्तर देईल, कोणाच्या जाण्याने पक्ष कमी होत नाही आणि कोणाच्या येण्याने वाढत नाही, अशी प्रतिक्रियाही खासदार डॉ. विखे यांनी दिली.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!