गणेशासोबत श्रीरामही अवतरले, पेणच्या गणेशमूर्तीवर राममंदीर उत्सवाचा प्रभाव

पेण शहरात वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. दरवर्षी ३५ लाख गणेश मूर्ती तयार करून देश-विदेशात पाठवल्या जातात.

अलिबाग : अयोध्येत २२ जानेवारीला श्री राम मंदीराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचे वातावरण आहे. अवघा आसमंत श्रीराममय झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. याचा प्रभाव पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायावरही झाल्याचे दिसून येत आहे. पेण येथील दिपक कला केंद्राने गणेशासोबत श्रीराम असलेली गणेश मूर्ती बाजारात आणली आहे.

पेण शहरात वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. दरवर्षी ३५ लाख गणेश मूर्ती तयार करून देश-विदेशात पाठवल्या जातात. यातून ६० कोटींची उलाढाल होते. दरवर्षी नवनवीन गणेश मूर्ती बाजारात दाखल होत असतात. ग्राहकांची मागणी आणि कल लक्षात घेऊन विविध रुपातील गणेश मूर्ती बाजारात आणल्या जात असतात. देशात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचाही या गणेशमूर्तींवर प्रभाव दिसून येत असतो.

हे वाचले का?  Creamy Layer : “अनुसूचित जातींचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट”, क्रिमीलेअरबाबत प्रकाश आंबेडकरांची सूचक पोस्ट

यावर्षी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रभाव गणेशमूर्तीवर झाल्याचे दिसून येत आहे. पेण शहरातील दिपक कला केंद्रात मूर्तिकार निलेश समेळ यांनी या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या सोबतीला कोंदडधारी प्रभू श्रीरामाची मुर्ती साकारली आहे. गणेशाच्या मागील बाजूस महिरप म्हणून अयोध्या मंदिराची सुरेख प्रतिकृती साकारली आहे.

ही मूर्ती सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. आकर्षक रंगसंगतीमूळे ही गणेश मूर्ती उठून दिसते आहे. येत्या गणेशोत्सवात ही गणेशा सोबत श्रीरामाची मूर्ती भाविकांच्या घराघरात दाखल होणार आहे. जे जे उत्तम आणि उदात्त असते, ते कला क्षेत्रात अवतरते, असे म्हणतात. याची प्रचिती भाविकांना या निमित्ताने येत आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

“अयोध्येतील श्रीराम मंदीर सोहळ्याचा उत्साह लक्षात घेऊन श्रीरामाच्या सोबतची गणेशमूर्ती तयार करण्याची संकल्पना सूचली, ती दोन दिवसांत प्रत्यक्षात साकारली. महत्वाची बाब म्हणजे ती लोकांच्या पसंतीस उतरली, याचा आनंद आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात अशा गणेशमूर्ती तयार करण्याचा आमचा मानस आहे”, असे मूर्तीकार निलेश समेळ यांनी म्हटले आहे.