चांगल्या पावसाबाबत गेल्या महिनाभरापासून भाकितांचा पाऊस अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष जलधारांची प्रतीक्षा राज्यातील सगळय़ाच शहर गावांतील नागरिकांना जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात आहे.
पावलस मुगुटमल
पुणे : चांगल्या पावसाबाबत गेल्या महिनाभरापासून भाकितांचा पाऊस अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष जलधारांची प्रतीक्षा राज्यातील सगळय़ाच शहर गावांतील नागरिकांना जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात आहे. त्यातच मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीचे दाखले हवामान विभागाकडून दिले जात असले, तरी नकाशात प्रगतिपथाद्वारे उत्तरेकडे सरकणारा पाऊस नक्की गेला कुठे, हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
मोसमी पाऊस दाखल झालेल्या भागांतही पाऊस गायब आहे. अनेक भागांत हंगामाची सुरुवात कोरडी झाल्याने खरिपाच्या पेरण्यांबाबत चिंता व्यक्त केली जात असून, राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यामध्ये राज्याच्या काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
मार्च ते मे या पूर्वमोसमी हंगामातही यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होते. पूर्वमोसमीच्या कालावधीत राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये एकही टक्का पाऊस झाला नाही. २० जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत पाऊस उणाच होता. संपूर्ण महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा ६६ टक्के उणा होता. त्यामुळे राज्यातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणावर घटला. जूनपासून सुरू झालेल्या मोसमी पावसाच्या हंगामात चांगला पाऊस होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हंगामाच्या पंधरवडय़ातील स्थिती पावसाबाबत चिंता व्यक्त करणारी ठरली आहे.
राज्यामध्ये दक्षिण कोकणातून १० जूनला मोसमी पावसाचा प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर ११ जूनला त्याने मोठा पल्ला गाठत थेट मुंबई-पुण्यापर्यंत मजल मारली. १३ जूनला मध्य महाराष्ट्र आणि कोकण ओलांडून त्याने मराठवाडय़ात प्रवेश करीत निम्मा महाराष्ट्र व्यापला. मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी या सर्व भागांत एक-दोन दिवस पाऊस झाला. मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर हलक्या सरी कोसळल्या, पण अद्याप एकाही ठिकाणी मोठा पाऊस झाला नाही. त्याचप्रमाणे मोसमी पाऊस दाखल होत असलेल्या भागातही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे राज्यात पंधरवडय़ातील पाऊस ५७ टक्क्यांनी उणा ठरलेला आहे.
उणा-खुणा..
पावसाच्या हंगामाचा पहिला महिना असणाऱ्या जूनच्या पंधरवडय़ात राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५७ टक्के पाऊस उणा आहे. एकूण २४ जिल्ह्यांमध्ये ५० ते ८० टक्के पाऊस कमी झाला आहे.
पाऊस कमी का?
राज्यात पूर्वमोसमी पाऊस कमी होता. त्यामुळे मोसमी पावसाच्या ऊर्जिततेसाठी पोषक वातावरण तयार होण्यात अडचणी निर्माण झाल्या. समुद्रातील बाष्पयुक्त वारे अधिक दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे भूभागाकडे येतात. त्यासाठी आवश्यक अधिक उंचीची कमी दाबाची क्षेत्रे आणि चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा सध्या अभाव आहे. त्यामुळेच समुद्रातील बाष्प येण्यात अडचणी निर्माण होत असून, पावसाचे प्रमाण कमी असल्याचे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.
धरणस्थिती..
जूनच्या पंधरवडय़ात कोकण विभागात सरासरीपेक्षा ५८ टक्के पाऊस कमी आहे. मध्य महाराष्ट्रात ५६ टक्के, तर मराठवाडय़ात ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे. विदर्भात सर्वाधिक ७१ टक्के पाऊस उणा ठरला आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर आदी जिल्ह्यांत पाऊस ७० टक्क्यांहून अधिक उणा आहे. राज्यातील धरणांत सध्या २२ टक्के पाणी असून, पुणे विभागात सर्वात कमी १४ टक्के पाणी आहे. नाशिक विभागात २१ टक्के, नागपूर विभागात २७ टक्के, कोकण विभागात ३६ टक्के, औरंगाबाद विभागात २७ टक्के, तर अमरावती विभागात ३२ टक्के पाणीसाठा आहे.
पुढल्या पाच दिवसांत..
मोसमी पावसाने सध्या निम्मा महाराष्ट्र व्यापला असून, दोन-तीन दिवसांत त्याची विदर्भात प्रगती होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र पुढील सुमारे पाच दिवस राज्यात काही भागांतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात मात्र काही भागांत १८ जूनपासून पाऊस जोर धरेल. जूनच्या अखेपर्यंत दक्षिण, उत्तर कोकणासह मराठवाडय़ातील काही भाग, विदर्भातील बहुतांश भागांत पावसाची सरासरी कमी राहील.
मुंबई-पुण्यात..
अधून मधून तुरळक भागात गेल्या आठवडय़ात गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसाखेरीज मुंबई आणि पुणेकरांना जोरधारा पहायला मिळालेल्या नाहीत. गेल्या दोन तीन दिवसांपासून सकाळपासून संध्याकाळपऱ्यंत निरभ्र आकाश, कडक उन पाहायला मिळत आहे. घामाच्या धारांनी सगळेच त्रासले आहेत.