गोव्याची पहिली महिला ग्रँडमास्टर असलेल्या भक्तीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळवला आहे.
तुषार वैती, लोकसत्ता
मुंबई : बुद्धिबळ ऑलिम्पियाडनंतर आता आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकू न देण्यात मोलाचा वाटा उचलल्याने मी खूप खूश आहे. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटता आल्याने आनंद द्विगुणित झाला असून आता खुल्या गटात ग्रँडमास्टर किताब पटकावण्याचे ध्येय असल्याचे महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने सांगितले.
गोव्याची पहिली महिला ग्रँडमास्टर असलेल्या भक्तीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळवला आहे. नेशन्स चषक स्पर्धेतील यशाविषयी भक्ती म्हणाली की, ‘‘चीन वगळता अनेक बलाढय़ संघ या स्पर्धेत उतरले होते. या स्पर्धेची संकल्पना वेगळी असल्याने दोन्ही संघांना पांढऱ्या आणि काळ्या मोहऱ्यांनिशी खेळण्याची संधी मिळत होती. सुरुवातीला या स्पर्धेत मला चांगली कामगिरी करता आली नाही. पण स्पर्धा उत्तरोत्तर बहरत गेल्यानंतर मला सूर गवसला आणि आत्मविश्वासही उंचावत गेला. मी पाच विजयांसह तीन बरोबरी आणि तीन पराभवांसह ११ पैकी ६.५ गुणांची कमाई केली. इंटरनेट कनेक्शन, अखंडित वीजपुरवठा या गोष्टी भारताच्या पथ्यावर पडल्याने आम्हाला घवघवीत यश संपादन करता आले.’’
‘‘कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका यांच्या अनुपस्थितीचा फटका भारताला बसला नाही. त्या दोघींच्या नसण्याचे दडपण आम्हाला सुरुवातीला जाणवत होते. भारताने या स्पर्धेत ‘ब’ संघ उतरवला असल्याचेही आम्हाला वाटत होते. पण अव्वल पटावर आर. वैशालीने खूपच चांगली कामगिरी के ली. स्पर्धेआधी आम्ही एकत्र सराव के ला होता. त्यामुळे आमच्यात चांगला समन्वय असल्याने कामगिरी उंचावत गेली. कर्णधार मेरी अॅन गोम्सनेही प्रत्येक लढतीदरम्यान आमचा आत्मविश्वास वाढवला. प्रत्येक सामन्याआधी मी प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांच्याशी बोलून तयारी करायचे. त्याचा फायदाही मला झाला,’’ असे भक्तीने सांगितले.