‘ग्रामसभा हेच गाव विकासाचे शक्तीस्थान’

खेडय़ांचा विकास झाला तरच,आपला आणि देशाचा विकास होईल. ग्रामसभा गावाची शक्तीस्थान असून गावाचा शाश्वत विकास हा येथील मतदान करणाऱ्या जनतेच्या हाती आहे.

अण्णा हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण क्षेत्रातील संस्थांचा कार्यक्रम

नाशिक : खेडय़ांचा विकास झाला तरच,आपला आणि देशाचा विकास होईल. ग्रामसभा गावाची शक्तीस्थान असून गावाचा शाश्वत विकास हा येथील मतदान करणाऱ्या जनतेच्या हाती आहे. ७३ वी आणि ७४वी घटना दुरुस्ती, माहिती अधिकार, दप्तर दिरंगाई , बदलीसारख्या कायद्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देशासाठी प्रेरणादायी योगदान लाभल्याने आज खेडी ही विकासाकडे झेपावली आहेत, असे प्रतिपादन पर्यावरण तसेच दुर्गप्रेमी राम खुर्दळ यांनी के ले.

हरसूल जवळील तोरगंण येथे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाशिक जिह्यतील पर्यावरण क्षेत्रात काम करण्याऱ्या संस्थांनी एकत्र येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. त्यावेळी खुर्दळ बोलत होते. यावेळी ब्रम्हगिरी कृती समिती, जल परिषद आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा यांच्या सहयोगातून शाळेतील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तोरंगणच्या सरपंच कमल बोरसे, पक्षीमित्र पोपट महाले, जलमित्र आणि आयोजक अनिल बोरसे, रामदास बोरसे, योगेश,बर्वे, मानव अधिकार समितीचे सुनील परदेशी, राहुल जोरे आदी उपस्थित होते. आत्मविश्वास व ध्येय पक्के असल्यास गावातील विकास करता येतो. अण्णा हजारे यांच्या या प्रयत्नांचे अनुसरण करून कित्येक गावे आदर्श झाली.गावातील पर्यावरण, डोंगर अबाधित ठेवा तो आपला श्वास आहे. माहिती अधिकाराच्या नागरी कायद्याने सामान्य माणसाला अधिकार मिळाला. त्यामुळेच गैर कारभाराला आळा बसतो. अण्णा हजारे ग्रामविकासाचे प्रणेते आहेत, असे भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील तसेच गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे यांनी सांगितले. यावेळी पर्यावरणमित्र साहित्यिक देवचंद महाले यांनी सामाजिक चळवळी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करत असल्याने त्याला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन के ले.