चंद्रपूर : “तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची तू वाघिणी”, आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत…

या पोस्टच्या माध्यमातून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी एकप्रकारे काँग्रेस पक्षातील त्यांचे विरोधक व अन्य पक्षातील विरोधकांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधन होऊन चार दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ‘ तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची, तू वाघिणी’ या समाज माध्यमावरील पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. या पोस्टच्या माध्यमातून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी एकप्रकारे काँग्रेस पक्षातील त्यांचे विरोधक व अन्य पक्षातील विरोधकांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रपूर-वणी-वरोरा लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजी दिल्लीत अकाली निधन झाले. धानोरकर यांच्या निधनाला अवघे चार दिवसांचा अवधी झाला आहे. मात्र राजकीय वर्तुळात आतापासूनच लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. दिवंगत खासदार धानोरकर यांच्या नंतर या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व कोण करणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

 ही चर्चा रंगली असतानाच आता धानोरकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांनी बाळू धानोरकर व प्रतिभा धानोरकर या दोघांचे छायाचित्रसह ‘ तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची, तू वाघिणी ‘ असा मजकूर असलेली एक पोस्ट समाज माध्यमावर सार्वत्रिक केली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांची ही पोस्ट म्हणजे काँग्रेस पक्षातील त्यांचे राजकीय विरोधक व अन्य पक्षातील विरोधकांना इशारा असल्याचे म्हटले जात आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

 विशेष म्हणजे दिवंगत खासदार धानोरकर यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार व राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा गट सक्रिय झाला होता. त्यामुळे आमदार धानोरकर यांचा इशारा हा काँग्रेसचा या दोन्ही नेत्यांना देखील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान दिवंगत खासदार धानोरकर यांच्या अस्थींचे शुक्रवारी माकरंडा येथे वैनगंगा नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. तर आज शनिवार पासून धानोरकर यांचे चंद्रपुरातील संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. ११ जून पर्यंत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहे. दरम्यान चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक कोण लढणार हा प्रस्न आहेच.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर