चक्रीवादळामुळे उष्णतेची लाट! ; बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र

पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि पश्चिम मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

नागपूर : हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात ते चक्रीवादळात परावर्तीत होईल. त्याचा परिणाम तापमानवाढीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो.

बंगालचा उपसागर या आठवडय़ाच्या अखेरीस वर्षांतील पहिल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या यजमानपदासाठी सज्ज असून १९ व २० मार्चदरम्यान अंदमान, निकोबार बेटांवर त्याचा परिणाम दिसेल. त्यामुळे या प्रदेशात जोरदार वारे, मुसळधार पाऊस पडेल. यातून नुकसानीचीही शक्यता आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटा आणि तीव्र उष्णतेच्या लाटेची नोंद होत आहे. सोमवारी आणि मंगळवारी गुजरात, राजस्थानच्या अनेक भागात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले. तर आग्नेय राजस्थान, विदर्भ, कोकण तसेच गोव्याच्या काही भागात ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले. सौराष्ट्र-कच्छच्या भागात उष्णतेच्या लाटेची तीव्र स्थिती नोंदवली गेली. कोकण-गोवा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट आणि गुजरात प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची स्थिती नोंदवली गेली. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान तीन ते सहा अंश सेल्सिअसने सामान्यपेक्षा जास्त होते. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबादवर अनेक ठिकाणी तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि सौराष्ट्र आणि कच्छमध्ये काही ठिकाणी आणि पूर्व राजस्थान आणि गुजरातमधील वेगळ्या ठिकाणी हीच स्थिती आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि पश्चिम मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची चिन्हे आहेत. भारताच्या मध्यवर्ती भागात यापूर्वीही मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. गुजरात, नैऋत्य राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, खूप जास्त तापमान नोंदवण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश यांसारख्या अतिशय उष्ण प्रदेशातून मध्य भारताकडे वाहणारे आग्नेय वारे हे या ठिकाणी इतक्या उच्च तापमानाचे मुख्य कारण आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

विदर्भाला सर्वाधिक झळ

वाढत्या तापमानाची सर्वाधिक झळ विदर्भाला बसली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून बुधवारी ४२.९ अंश सेल्सिअससह अकोला तर गुरुवारी ४३ अंश सेल्सिअससह चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. देशात सर्वाधिक तापमान राजस्थानमध्ये ४३.५ इतके नोंदवण्यात आले. तर महाराष्ट्रात चंद्रपूर हे ४३ अंश सेल्सिअसह सर्वाधिक उष्ण शहर ठरले. मागील वर्षी याच शहरात ३० मार्चला ४३.६ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. चंद्रपूरपाठोपाठ अकोला शहरातही ४२.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. मुंबई, ठाणे या शहरांमध्ये आजतागायत उच्च तापमानाची नोंद नव्हती, पण यावर्षी येथेही ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले. पुण्यात आजपर्यंत कधी तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले नव्हते, पण तेथेही यावेळी तापमान ३९.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मराठवाडय़ातही औरंगाबाद शहरात ३९.५, बीड ४०.१ अंश सेल्सिअस तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

हे वाचले का?  Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान