चांगभलं: अनाथ बालकांचे सरकारी मदतदूत; करोनामुळे पालक गमावलेल्या ५६ मुलांची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे

याआधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार दिला होता.

नाशिक : करोना विषाणू साथीत अनेक कुटुंबांची वाताहत झाली. घरातली कमावती व्यक्ती दगावल्याने आर्थिक संकट उभे राहिले. दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने कित्येक बालके अनाथ झाली. त्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला. नाशिक जिल्ह्यातील अशाच ५६ अनाथ बालकांची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांनी स्वीकारली. ४० अधिकारी त्यांचे मदतदूत बनले.

याआधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार दिला होता. २६८ कुटुंबांना शासकीय योजना, सामाजिक संस्थांकडून मदत मिळवून दिली. त्याच धर्तीवर, करोनाच्या संकटात पालक गमावलेल्या बालकांच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
प्रशासकीय आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात करोना संसर्गाने २६४३ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ५८ बालकांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला, तर २५८५ बालकांच्या आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाचे अर्थात पतीचे निधन झालेल्या महिलांची संख्या २३४५ आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित


दोन्ही पालक गमावलेल्या ५६ अनाथ बालकांचे मदतदूत म्हणून काम करण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवले. या उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह सर्व अधिकारी जबाबदारी स्वीकारलेल्या अनाथ बालकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतात. वात्सल्य मोहिमेंतर्गत त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन केले जाते. या उपक्रमाने अनाथ बालकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास गती मिळाली आहे.


उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी, जबाबदारी स्वीकारलेल्या अवधूत आणि आरोही जोशी या लहानग्या अनाथ भाऊ-बहिणीची भेट घेतली. दोघे पंचवटीत आजीकडे राहतात. त्यांच्या पालकांचे घर, जमीन आजीच्या नावे करण्यात आली. भेटीत मुलांच्या शाळेचे शुल्क भरण्याबाबतची समस्या पुढे आली. त्यामुळे शाळा संस्थेशी चर्चा करून यातून मार्ग काढला जाणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

पालकांच्या मृत्यूनंतर तेजस शिंदे याची जबाबदारी सिन्नर येथील त्याच्या बहिणीने घेतली. त्याच्या बहिणीचे कुटुंब जीर्ण घरात राहते. भेटीत ही बाब लक्षात आल्यावर रमाई आवास योजनेंतर्गत या कुटुंबाला घरकूल देण्याची तयारी करण्यात आली. अनाथ बालकांचे बँक खाते उघडणे, शिधापत्रिकेत त्यांची नावे समाविष्ट करणे, त्यांची नावे वडिलोपार्जित मालमत्तेवर नोंदवणे, विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रक्रिया राबवणे, जातीचा दाखला काढणे, शाळेत प्रवेश मिळवून देणे आदी कामे अधिकारी करीत आहेत.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

नाशिकमध्ये सामाजिक संस्थांकडून अनाथ बालकांना मदत मिळवून दिली जात आहे. येवला येथील दोन अनाथ बालकांना माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने ११ हजार रुपयांची मदत मिळवून देण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी एकमुखाने स्वीकारली आहे. करोना साथीत पालक अथवा जोडीदार गमावलेल्यांसाठी वात्सल्य योजना सुरू आहे. जिल्ह्यात एका कार्डवर सर्व लाभ देण्याच्या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसत आहेत. या उपक्रमातून प्रत्येक कुटुंबाला एक वरिष्ठ महसूल अधिकारी जोडला गेल्यामुळे सर्व कामे गतीने पूर्ण होतील. जे नातेवाईक अनाथ बालकांचा सांभाळ करीत आहेत, त्यांच्याबरोबर प्रशासन आहे ही भावना दृढ होऊन ते चांगल्या प्रकारे संगोपन करतील, याची खात्री वाटते अशी प्रतिक्रिया नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी