चांगभलं : बुद्धीला परिश्रमाची जोड देत ध्येयाला गवसणी; वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलांची गगनभरारी

१९८१ पासून ज्या सायकलने त्यांनी पेपर टाकण्यास सुरुवात केली, ती सायकलदेखील त्यांनी जपून ठेवली असून अजूनही त्याच सायकलवरून ते वृत्तपत्र वितरणाचे काम करीत आहेत.

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

परिस्थितीमुळे आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन गगनभरारी घ्यावी, अशी मनीषा बाळगणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न तीनही मुलांनी बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड देत साकार केले आहे. वृत्तपत्र विक्री (वेंडर) करून कसेबसे पोट भरणाऱ्या प्रेमदास सहारे यांची तिन्ही मुले आज मोठ्या पदावर आहेत. मोठी मुलगी आयटी कंपनीत, दुसरी वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक, तर मुलगा आंतराष्ट्रीय वित्त संस्थेमध्ये मोठ्या पदावर आहेत.

उत्तर नागपुरातील नालंदानगर येथील प्रेमदास सहारे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून नागपुरातील माऊंट रोड परिसरात घरोघरी वृत्तपत्रे वितरणास सुरुवात केली. ते सदर, विजयनगर, राजनगर, जरीपटका वस्त्यांमध्ये सायकलवर फिरून भल्यापहाटे वृत्तपत्र घरोघरी पोहचवतात. पत्नीचे शिक्षण आठवीपर्यंतचे. त्या घरकाम करून त्यांना मदत करतात. सहारे यांना वृत्तपत्र विक्रीतून हजार ते दीड हजार रुपये महिन्याला मिळत. एवढ्याशा उत्पन्नात ते घर चालवत, पण दोन मुली आणि एका मुलाच्या शिक्षणात कुठेही खंड पडणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. मुलांनीदेखील वडिलांचे काबाडकष्ट आणि तगमग वाया जाऊ दिली नाही. दोन्ही मुलींना जरीपटका येथील हिंदी माध्यमाच्या दयानंद आर्य कन्या विद्यालयातून पहिली ते बारावीचे शिक्षण दिले, तर मुलाने जरीपटका येथील हिंदी माध्यमाच्या महात्मा गांधी विद्यालयात प्राथमिक, माध्यामिक शिक्षण पूर्ण केले. तीनही मुले अभ्यासू, हुशार आणि मेहनती होते. त्यामुळे त्यांना चौथी, सातवीत शिष्यवृत्ती मिळाली, तर मुलांची हुशारी आणि आर्थिक स्थिती बघून शिकवणी वर्गातील शिक्षकांनी अर्धेच शुल्क देण्याची मुभा दिली.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

सहारे यांच्या मोठ्या मुलीने एमसीए करून पुण्यात टेक महिंद्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारली. दुसरी मुलगी एमडीएस करून भारती विद्यापीठ, सांगली येथे वरिष्ठ प्राध्यापक पदावर रुजू आहे, तर मुलाने आयआयटी, मुंबई येथून एम.टेक. केले आणि पुढे तो इंग्लंड येथील बार्कलेज बँकला रवाना झाला. सध्या तो अमेरिकास्थित वित्त संस्था गोल्डमन सॅक्समध्ये कार्यरत आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

तीनही मुलांनी उच्चविद्याविभूषित होऊन मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या असल्या तरी सहारे यांचे पाय जमिनीवरच आहेत. ज्या व्यवसायाने अडचणीच्या काळात घर चालवण्यास आणि मुलांना शिकवण्यात मोलाची साथ दिली, तो व्यवसाय सोडून देण्यास ते तयार नाहीत. शरीर साथ देईस्तोवर काम करत राहणार असा त्यांनी संकल्प केला. एवढेच नव्हेतर १९८१ पासून ज्या सायकलने त्यांनी पेपर टाकण्यास सुरुवात केली, ती सायकलदेखील त्यांनी जपून ठेवली असून अजूनही त्याच सायकलवरून ते वृत्तपत्र वितरणाचे काम करीत आहेत.

जिवाभावाची सायकल

‘लोकसत्ता’शी बोलताना सहारे म्हणाले की, मुले हुशार होती. त्यांनी त्यांचे ध्येय गाठले. मी ज्या सायकलने गेली ४० वर्षे पेपर टाकण्याचे काम करतो, ती सायकल कशाला सोडू. मुले म्हणतात, आता पेपर टाकणे बंद करा, पण मी त्यांना सांगतो या व्यवसायाने आपल्या कठीण समयी तारले. शिवाय सकाळी उठून पेपर टाकल्यास आरोग्य चांगले राहते. म्हणून शरीर साथ देईस्तोवर पेपर टाकण्याचे काम करणार आहे.

हे वाचले का?  Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद