चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी देवी मंदिर २४ तास खुले; नांदुरी ते सप्तश्रृंग गड बससेवेची व्यवस्था; मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था सज्ज

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथील श्री सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव १० ते १६ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

कळवण : उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथील श्री सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव १० ते १६ एप्रिल या कालावधीत होणार आहे. चैत्रोत्सवात मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार असून राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी नांदुरी ते सप्तश्रृंग गड अशी बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. 

चैत्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात सप्तशृंगी गड येथील भक्तांगण सभागृ़हात मालेगावच्या अप्पर जिहाधिकारी माया पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुख, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट, स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामस्थ, व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. करोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने चैत्रोत्सवात मोठय़ा प्रमाणात भाविक हजेरी लावण्याची शक्यता असल्याने सर्वच विभागांनी यात्रोत्सवास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, अशा सूचना पाटोळे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

 करोना काळाच्या दोन वर्षांनंतर यात्रा होत आहे. पहिल्या दिवशी सर्वच अधिकारी, कर्मचारी सज्ज असतात. यात्रा सुरळीत सुरू झाल्यांनतर मध्येच कोणी घरी जाऊ नये. कुठलीही घटना सांगून येत नाही. दर्शन चोवीस तास सुरु राहणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने  प्रत्येकाने आपआपली जवाबदारी चोख पार पाडावी, अशा सूचनाही पाटोळे यांनी दिल्या.

बैठकीसाठी तहसीलदार बंडू कापसे, निफाडचे पोलीस उपाधीक्षक तांबे,  कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार, आगार व्यवस्थापक हेमंत पगार, गटविकास अधीकारी निलेश पाटील, वनविभागाचे वसंत पाटील,  ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, भगवान नेरकर, गड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, सदस्य राजेश,  संदिप बेनके आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

यात्रा काळात खासगी वाहनांना गडावर प्रवेश बंदी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चार मेटल डिटेक्टर दरवाजे, १२ हॅन्ड मेटल डिटेक्टर असणार आहेत. नारळ फोडण्यासाठी पहिल्या पायरीजवळ पाच यंत्रांची व्यवस्था करण्यात आली  आहे. आग नियंत्रणाच्या हेतूनेही व्यवस्था राहील. यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी २५३ क्लोज सर्किट कॅमेरे, टीव्ही, ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. ही यंत्रणा पोलीस नियंत्रण कक्ष, उपकार्यालय येथील नियंत्रण कक्ष आणि मुख्य नियंत्रण कक्षास जोडलेली राहील. श्री भगवती मंदिरासह चढण आणि उतरण मार्गावर आवश्यकतेनुसार पाणपोईची सुविधा ठेवली जाणार आहे.

११० बसची व्यवस्था

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी यात्रा काळात नांदुरी ते सप्तशृंगी गड बससेवा सुरू राहणार आहे. यासाठी ११० बसची व्यवस्था करण्यात येणार असून २५० चालक, २५० वाहक तसेच ८० प्रशासकीय कर्मचारी नगर, धुळे, जळगाव येथून नियुक्त केले जाणार आहेत, वैद्यकीय सेवेत १२४ अधिकारी कर्मचारी उपलब्ध राहणार असून  कर्मचारी प्रतिनियुक्तीवर बोलविण्यात येणार आहे. तसेच पोलीस बंदोबस्तात दोन अधीक्षक, २५ अधिकारी, १९० पोलीस, २०० गृहरक्षक, २५ महिला गृहरक्षक असणार आहेत.