चौथ्या टप्प्यात मत टप्पा वाढविण्याचे आव्हान

एमआयएएमचे खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे या तिघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

औरंगाबाद

एमआयएएमचे खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे या तिघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. भुमरे यांच्या दारूच्या दुकानांवरून ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढविला. खासदार ‘दारूवाला हवा का’, असा सवाल केला. मुस्लीमबहुल भागात जलील यांना पाठिंबा मिळेल. शिवसेना शिंदे गटाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तिन्ही उमेदवार ताकदवान असल्याने तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल याबाबत अंदाज वर्तविणे कठीण आहे. या मतदारसंघात सुमारे २० लाख मतदार आहेत.

पुणे

गेली दहा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे यांच्यात लढत होणार आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेली सव्वा वर्ष रिक्त असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मतदारसंघात लक्ष घातले होते. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी ‘कसबा पॅटर्न’च्या पुनरावृत्तीवर भर दिला आहे. सुमारे २१ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या सभा पार पडल्या आहेत.

नगर

नगर मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे (भाजप) व महाविकास आघाडीचे माजी आमदार नीलेश लंके (शरद पवार गट) यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. नगरमध्ये शरद पवार यांनी लक्ष घालत, उमेदवारीसाठी नीलेश लंके यांना निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातून पक्षात घेतले होते. नगरमधील लढतीला नेहमीप्रमाणेच विखे-पवार परंपरागत वादाची झालर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही त्यांची स्वत:ची यंत्रणा विखेंविरोधात नगरमध्ये उतरवली आहे. मतदारसंघ औद्याोगिक विकास, रस्ते, दुष्काळ, रोजगार या प्रश्नांनी ग्रासलेला आहे. मात्र या प्रश्नांचा ऊहापोह न होता दोन्ही बाजूंनी प्रचारात व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांवर भर राहिला. समाजमाध्यमांतून परस्परांची उणीदुणी काढण्यात आली. या मतदारसंघात १९ लाख ८१ हजार मतदार आहेत.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

रावेर

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात खडसे यांची ताकद असली तरी निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्याने चुरशीच्या लढतीची हवा निघून गेली. मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. या मतदारसंघात सुमारे १८ लाख मतदार आहेत.

शिरुर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात पुन्हा एकदा चुरशीची लढत होत आहे. गेल्या वेळी हेच दोघे परस्परांच्या विरोधात लढले होते. फरक एवढाच की यंदा आढळराव पाटील घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. तर शिवसेना ठाकरे गट यंदा डॉ. कोल्हे यांच्याबरोबर आहे. अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत ही अजित पवार यांची भविष्यवाणी खरी ठरते का याचीही उत्सुकता आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

शिर्डी

खासदार सदाशिव लोखंडे (शिंदे गट) व महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या तिसऱ्या उमेदवार उत्कर्षा रूपवते किती मते खेचतात व त्याचा फटका कोणाला बसतो, यावरही सारी गणिते अवलंबून आहेत. लढत दोन आजी-माजी खासदारांमध्ये होत असली तरी ती अप्रत्यक्षपणे याच मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच रंगलेली आहे.

जळगाव

भाजपने खासदार उमेश पाटील यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या बंडखोरीचा फटका बसेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. खासदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून भाजपला आव्हान दिले आहे. स्वत: पाटील हे रिंगणात नाहीत. त्यांचे समर्थक करण पवार हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवीत आहेत. भाजपने गेल्या वेळी जाहीर झालेली उमेदवारी रद्द केलेल्या स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. प्रचाराच्या अखरेच्या दिवशी माजी मंत्री सुरेश जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

जालना

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात लढत होत आहे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा जालना जिल्हा हा केंद्रबिंदू होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला त्रासदायक ठरू शकतो. दानवे यांचा लोकसंपर्क हे त्यांची जमेची बाजू आहे. २००९ मध्ये दानवे आणि काळे यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली होती आणि दानवे फार कमी मताधिक्याने विजयी झाले होते. त्याची पुनरावृत्ती यंदा होते का, याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात १९ लाख ६७ हजार मतदार आहेत.

हे वाचले का?  कराड: पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी लवकरच राज्यातील पहिले ‘सौरग्राम’, ‘माझी वसुंधरा’च्या बक्षिसातून गावाला सौरऊर्जेची झळाळी

बीड

जातीय वळणावर जाणारी निवडणूक ही बीडची खासीयत. यंदाही बीडची लढत ही जातीय झाली आहे. भाजपच्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी आव्हान दिले आहे. धनंजय मुंडे यांची साथ असणे ही पंकजा यांच्यासाठी जमेची बाजू. पण मराठा विरुद्ध वंजारी अशी सरळसरळ विभागणी झालेल्या या मतदारसंघात मराठा, मुस्लीम आणि दलित यांची मोट बांधण्याचा सोनावणे यांचा प्रयत्न यशस्वी होतो का, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

नंदुरबार

खासदारकीची हॅट्ट्रिक साधण्यासाठी रिंगणात उतरलेल्या भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्यापुढे पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षाच्या नाराजीचे आव्हान होते. शेवटच्या टप्प्यात सारे कामाला लागले होते. काँग्रेसचे गोवाल पाडावी यांनी चांगली लढत दिली आहे. पाडावी हे काँग्रेसचे आमदार के. सी. पाडावी यांचे पुत्र. आदिवासीबहुल मतदारसंघावर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सारी ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या लागोपाठ सभा झाल्या.