जंगली प्राण्याला जेरबंद करताना आता संबंधित क्षेत्रातसंचारबंदी

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे संकेत

नाशिक : पुणे शहरात गव्याला बघण्यासाठी झालेली गर्दी आणि नाशिक शहरात बिबटय़ाला पकडताना होणारी गर्दी यामध्ये फारसा फरक नाही. बघ्यांची मानसिकता एकसारखीच आहे. पुणे शहरात गर्दीमुळे सैरभैर झालेल्या गव्याला पकडण्यात आले. मात्र त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. गव्याच्या हल्ल्यात कोणी जखमी झाले नाही हे सुदैव. नाशिकमध्ये मात्र तसे घडलेले नाही. बिबटय़ाला बघण्यासाठी अगदी युवती, महिलादेखील मागे नसल्याची उदाहरणे आहेत. काही अतिउत्साही मंडळी बिबटय़ाला पकडण्यासाठी पुढे सरसावून जखमी झालेले आहेत. अशा प्रसंगात ‘माणसे जितकी प्राण्यासारखी वागतात, तितका तो प्राणीसुद्धा हिंस्र वागत नाही’ ही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मांडलेली व्यथा पुणेच नव्हे तर नाशिकमध्येही तेवढीच लागू पडते. म्हणूनच मानवी वस्तीत शिरलेल्या जंगली प्राण्याला पकडण्यासाठी त्या भागात संचारबंदी लागू करण्याच्या निर्णयाप्रत ते आले आहेत.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरल्यानंतर काय होते, याची काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सातत्याने अनुभूती मिळत आहे. शहरात अनेकदा बिबटय़ाचा शिरकाव झाला आहे. मध्यंतरी गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगर भागात शिरलेल्या बिबटय़ाला जेरबंद करताना वनविभागाला अडचणींना तोंड द्यावे लागले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांपर्यंत असे सर्व बिबटय़ाला बघण्यासाठी गर्दी करत होते. भ्रमणध्वनीवर छायाचित्रे टिपली जात होती. बघ्यांना हटविण्यात पोलीस यंत्रणेची शक्ती खर्च पडली होती. गर्दीमुळे बिबटय़ा हिंस्र बनला होता.

या भागातील स्थानिक नगरसेवकाने तर कमाल केली. त्याला पकडण्यासाठी तो पुढे सरसावला. बिबटय़ाच्या हल्ल्यात त्यालाही जखमी व्हावे लागले. वनविभागाने अथक प्रयत्नांती बिबटय़ाला जेरबंद केले. शहर परिसरात शिरकाव करणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद करताना असे अनेकदा घडलेले आहे. गर्दीमुळे अडथळे येतात. वारंवार आवाहन करूनही बघे मागे हटत नाही. गवा बघण्यासाठी जमलेले पुणेकर आणि बिबटय़ाला पाहण्यासाठी धडपडणारे नाशिककर यांच्यात कोणताही फरक नसल्याचे लक्षात येते.

हे वाचले का?  मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान

पुण्यातील घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नागरिकांच्या मानसिकतेवर बोट ठेवत असे प्रकार जिल्ह्यत घडू नये म्हणून त्या भागात संचारबंदी लागू करण्याचे सूचित केले आहे. मेळघाटमध्ये कार्यरत असताना गवे कित्येकदा हापश्याचे पाणी पिण्यासाठी येत असत. गावातील लोक, लहान मुले त्यांच्या आजूबाजूला फिरायचे. एखादा प्राणी चुकून मानवी वस्तीत शिरतो, त्या वेळी माणसे जितकी प्राण्यासारखी वागतात, तितका तो प्राणीसुद्धा हिंस्र वागत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

मानवी वस्तीत शिरलेल्या जंगली प्राण्याला पकडण्यात बघ्यांच्या गर्दीमुळे अडथळे येतात. गर्दीमुळे प्राणी अधिक बिथरतो आणि धोकादायक स्थिती निर्माण होते. नाशिक जिल्ह्यत असा प्रसंग घडल्यास त्या क्षेत्रात तातडीने संचारबंदी जाहीर करून केवळ वनविभाग, पोलीस आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञ यांनाच तो प्राणी पकडण्याची मुभा दिली जाईल. नागरिकांना जनावरांच्या मागे पळणे, छायाचित्र काढण्यास प्रतिबंध राहील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल. असा प्रसंग जिल्ह्यत घडल्यास नागरिकांनी गर्दी न करता सहकार्य करावे.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)

संग्रहित छायाचित्र