जगभरात पुन्हा खळबळ… जपानमध्ये आढळला करोनाचा नवा स्ट्रेन

ब्रिटन, द. आफ्रिकेतील विषाणू इतकाच घातक असण्याची शक्यता

ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही करोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेले हे चारही रुग्ण ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन राज्यातून टोकीयोमध्ये परतले होते. करोनाचा हा नवीन स्ट्रेन आतापर्यंत जगामध्ये कुठेच आढळून आलेला नाही. तज्ज्ञांनी या स्ट्रेनसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून हा नवीन प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनप्रमाणेच अधिक जास्त संसर्गजन्य असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या नवीन स्ट्रेनचा खुलासा झाल्याने जगभरामध्ये पुन्हा खळबळ माजली आहे.

जपानमध्ये संसर्गजन्य आजारांसंदर्भात काम करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेनच्या (एनआयआयडी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलमधून देशात दाखल झालेल्या चार जणांमध्ये करोनाचे नवीन विषाणू आढळून आले आहेत. मात्र हे विषाणू ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनच्या करोना विषाणूसारखे नसून त्याहूनही वेगळे आहेत. या नवीन प्रकारच्या विषाणूचा स्ट्रेन हा यापूर्वी आढळून आलेल्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी खूप साधर्म्य असणारा आहे. एनआयआयडीने रविवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये या नव्या स्ट्रेनच्या संसर्गासंदर्भातील माहिती देताना या विषाणूमधील बदल हा मर्यादित आहे. मात्र हा विषाणू किती संसर्गजन्य आहे हे ठोसपणे आताच सांगता येत नसलं तरी तो इतर दोन स्ट्रेन इतकाच संसर्गजन्य असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या विषाणूचा संसर्ग होण्याचा वेग आणि त्यावर लसीचा परिणाम होईल की नाही हे संशोधनानंतरच स्पष्ट होणार असल्याचं एनआयआयडीच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

निक्केई एशियामधील वृत्तानुसार नवीन विषाणू हे दोन जानेवारी रोजी ब्राझीलमधून जपानमधील हनेदा विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांमध्ये आढळून आलं. या चार प्रवाशांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष प्रवाशांचा समावेश आहे. या सर्वांची विमानतळावर चाचणी करण्यात आली असता चाचणीचे निकाल सकारात्मक आले. या प्रवाशांमध्ये करोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे, ताप आणि घसा खवखवणे असा त्रास होत आहे.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

जपानच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ब्राझीलवरुन जपानमधील हनेडा विमानतळावर दोन जानेवारी रोजी दाखल झालेल्या चार प्रवाशांमध्ये नवीन प्रकारचा करोना विषाणू आढळून आला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. एनआयआयडीने या नवीन स्ट्रेनची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या एनआयआयडी या विषाणूवर संशोधन करत असून हा विषाणू अधिक धोकादायक आहे की नाही यासंदर्भातील तपास करत आहे.

जपानमधील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार जपानमध्ये आढळून आलेला हा नवीन प्रकारचा विषाणू अद्याप विकसित होण्याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे तो किती संसर्गजन्य आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. जगभरात वेगवेगळ्या देशांनी तयार केलेल्या लसी या नव्या विषाणूवर परिणामकारक ठरतील की नाही हे ही आत्ताच सांगता येणार नाही. सध्या जपानमध्ये दिवसाला सात हजार करोना रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत देशामध्ये तीन हजार ९०० हून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

जपानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने आप्कालीन परिस्थितीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. सात फेब्रुवारीपर्यंत जपानमध्ये ही आप्कालीन घोषणा लागू असणार आहे. या काळात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य असणार आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगही बंधनकारक असणार आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.