सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषण केले.
संयुक्त राष्ट्र : ‘‘पश्चिम आशियातील सध्याच्या वाढत्या हिंसाचारासह जगभरात बिघडलेली सुरक्षा स्थिती आणि वाढती अशांतता ‘एक जग, एक कुटुंब’ या संकल्पनेशी अगदी विसंगत आहे. भेदभाव आणि अविश्वासाच्या सध्याच्या काळात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होत आहे,’’ असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये व्यक्त केले.
सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषण केले. या परिषदेला आघाडीचे विद्वान, नेते, मुत्सद्दी आणि संयुक्त राष्ट्रांचे राजदूत उपस्थित होते. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि आंतरराष्ट्रीय शांतिसेना आणि हवामान बदल यावर दोन परिसंवाद झाले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शांतिमोहिमांचे अवर महासचिव (अंडर सेक्रेटरी जनरल) जीन पियरे लॅक्रोक्स, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी विजय नांबियार आदींनी यात सहभाग घेतला. ही परिषद संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मंडळ आणि ‘आयसीसीआर’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. सहस्रबुद्धे म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या संघटनात्मक चळवळीचा उद्देश नेमकेपणाने मांडण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’शिवाय अन्य कोणतेही प्रभावी सूत्र नाही. भारतीय राष्ट्रवादाचा विचार कधीच संकुचित विचारांचा नव्हता, असे ते या वेळी म्हणाले.