मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न, नागरिकांनी घ्यायची काळजी, राज्यातील विकासकामं, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा अशा विविधी गोष्टींवर राज्य सरकारची भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेही लगावले. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं प्रतिपादनही उद्धव ठाकरेंनी केलं.
आपल्या भाषणाच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही धोका अजून टळलेला नाही असं सांगत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना काळजी घेण्याचं आवाहन केलं. यानंतर कांजुरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी विरोधकांना साद घालत…हवं असल्यास याचं श्रेय तुम्हाला देतो पण हा मुद्दा चर्चेतून सोडवूया असं बोलायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. “मी आपल्याशी खोटं बोलणार नाही. मी ज्या खुर्चीवर बसलो आहे त्याचं महत्व जाणतो. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असं एकही काम करणार नाही”, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला विश्वास दिला.
दरम्यान राज्यात पुन्हा लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लावण्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली. “अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नाहीये. पुन्हा लॉकडाउन नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण अनुभवातून शिकलोय,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.