जम्मूमध्ये पूरसदृश स्थिती; नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत; जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक बंद

रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू : अतिवृष्टीमुळे जम्मू प्रदेशात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दोडा आणि किश्तवाड जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनने दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. त्यांनी सांगितले, की अनेक ठिकाणी, विशेषत: कठुआ आणि सांबा जिल्ह्यांत नद्या-नाले पूर धोक्याच्या पातळीजवळ पोहोचले आहेत. काही नदी-नाल्यांनीही पातळीही ओलांडली आहे.

 या भागात आणखी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, जम्मू विभागातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  डोंगरांवरून मातीची धूप झाल्याने व दरड कोसळल्याने अधिकाऱ्यांना वाहतूक बंद करावी लागली. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की हा महामार्ग अजूनही ठप्प आहे आणि प्रवाशांना भूस्खलनमुळे साठलेले ढिगारे रस्त्यावरून हटवेपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचले का?  Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा डिसेंबर अखेरीस भारताच्या ताब्यात?

अधिकाऱ्यांनी सांगितले, की संततधारेमुळे चिनाब आणि तिच्या उपनद्यांची पातळी वाढत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वैष्णोदेवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी तळशिबिर असलेल्या कटरा येथे ३१५.४ मिमी पाऊस कोसळला. १९८० नंतर येथे आता सर्वाधिक पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. जम्मू-स्थित हवामान विभागाच्या केंद्राचे अध्यक्ष मोहिंदूर सिंग यांनी सांगितले की, या भागात येत्या आठवडय़ात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीरच्या विविध भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. कटरा येथे अतिवृष्टी (३१५.४ मिमी) झाली आहे. गेल्या ४३ वर्षांत या प्रदेशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 

वैष्णोदेवीची नव्या मार्गावरील यात्रा स्थगित

* रियासी जिल्ह्यातील कटरा शहरात भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा नवीन मार्ग यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आला आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

* या भागात गेल्या ४३ वर्षांत सर्वाधिक पाऊस (अतिवृष्टी) झाला. खराब हवामानामुळे या मंदिरासाठीची हेलिकॉप्टर सेवाही बंद करण्यात आली आहे. तथापि, यात्रेकरू जुन्या मार्गाने त्रिकुटा टेकडीवरील मंदिरापर्यंत जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

* ‘श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितले की, भूस्खलनाच्या धोक्यामुळे नवीन मार्गावरील यात्रा स्थगित करण्यात आली आहे. वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारी हेलिकॉप्टर आणि बॅटरी मोटार सेवाही बंद करण्यात आली आहे. मात्र जुन्या मार्गावरून यात्रा सुरू आहे. मात्र, बॅटरी मोटार मार्ग दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे बंद केला आहे.

* वैष्णोदेवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचे तळशिबिर असलेल्या कटरा येथे २४ तासांत ३१५.४ मिमी पाऊस झाला. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की, १९८० नंतर आता हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. कटरा येथे ३१ जुलै २०१९ रोजी २९२.४ मिमी पाऊस पडला होता.

हे वाचले का?  Germany Needs Indian Workforce: जर्मनीला भारतीय कामगारांची आवश्यकता का? भारतीयांसाठी जर्मनीने वाढवला ‘व्हिसा कोटा’

‘अमरनाथ यात्रेकरूंनी नियम पाळावेत’

मोहिंदूर सिंग यांनी अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंना त्यांच्या संबंधित तळ शिबिरांनी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले, की प्रवास सुरू करण्यापूर्वी, यात्रेकरूंनी हवामान अहवाल आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. जम्मू आणि काश्मीरमधील सखल भागात पूर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.