जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील उद्योजक! जाणून घ्या ‘केपीआयटी’चे रवी पंडित यांच्याविषयी…

पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे.

पुणे : पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. जगभरातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांना केपीआआयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविते. याआधी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे यांनी या यादीत स्थान मिळविले होते.

पंडित हे सध्या केपीआयटीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. केपीआयटीचे बाजारभांडवल ४० हजार ५०० कोटी रुपये आहे. कंपनीकडून बीएमडब्ल्यू, होंडा, फोर्ड आणि जनरल मोटर्स यासारख्या जागतिक पातळीवरील वाहननिर्मिती कंपन्यांना सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविली जातात. सध्या कंपनीत १२ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, युरोप, अमेरिका, जपान, चीन, थायलंडमध्ये कंपनीची कार्यालये आहेत.

हे वाचले का?  अलिबागच्या नाट्यगृहासाठी ९ कोटी ३२ लाखांचा निधी

पंडित यांची संपत्ती १.२ अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षभरात केपीआयटीच्या समभागात तेजी दिसून आली आहे. भांडवली बाजारात कंपनीच्या समभागात झालेल्या वाढीमुळे फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या २०२४ च्या यादीत पंडित यांनी स्थान पटकावले आहे. गेल्या चार वर्षांत भांडवली बाजारात केपीआयटीच्या समभागात ३ हजार ६०० टक्के वाढ झाली आहे. केवळ गेल्या वर्षी समभागात ८२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी कंपनीचा महसूल १ हजार ५१६ कोटी रुपये तर नफा २८० कोटी रुपये होता.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

सनदी लेखापाल ते आयटी क्षेत्र

रवी पंडित हे सनदी लेखापाल असून, त्यांच्या वडिलांचा सनदी लेखापाल सेवा कंपनी होता. हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची महत्वकांक्षा होती. यासाठी त्यांनी एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ते भारतात परतले. नंतर त्यांनी वडिलांच्या कीर्तने पंडित कंपनीचे रुपांतर हळूहळू माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपनीत करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पुढे कंपनी केपीआयटी टेक्नॉलॉजीज या नावाने नावारूपास आली.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप