भारतात काही मोठय़ा शहरांमध्ये या लशीच्या साठवणुकीची व्यवस्था होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ प्रतिबिंधक फायझर-बायोएनटेक लशीला आपत्कालीन मान्यता दिली असून याचा अर्थ ही लस आता गरीब देशांनाही उपलब्ध होणार आहे. पण असे असले तरी या लशीच्या साठवणुकीसाठी खूपच कमी तापमानाची गरज असल्याने ती ठेवणार कुठे व पोहोचवणार कशी हा प्रश्न आहे.
भारतात काही मोठय़ा शहरांमध्ये या लशीच्या साठवणुकीची व्यवस्था होऊ शकते. युरोप व उत्तर अमेरिकेत या लशीला आधीच मान्यता देण्यात आली असून साथीच्या काळात संबंधित देशांच्या औषध नियंत्रक संस्था लशीला मान्यता देत असतात. पण काही देशांच्या व्यवस्था इतक्या कमकुवत आहेत, की त्या जागतिक आरोग्य संघटनेवर अवलंबून असतात.
फायझर- बायोएनटेक यांच्या लशीला अमेरिका, ब्रिटन, युरोपीय समुदाय व इतर डझनभर देशात मंजुरी देण्यात आली आहे. या लशीने महत्त्वाच्या अशा सुरक्षा व परिणामकारकता अटींची पूर्तता केली असून त्यामुळेच या लशीला मान्यता देण्यात आली. फायझर -बायोएनटेक यांची लस अत्यंत कमी तापमानाला साठवली जाते, त्यामुळे विकसनशील देशांसाठी ही लस मिळाली तरी साठवणार कुठे व कशी हा प्रश्न आहे. कारण ही लस साठवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शीतगृहांची गरज आहे.
आयात परवाना देणे शक्य
जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी म्हटले आहे, की फायझरच्या कोविड १९ लशीला आपत्कालीन मान्यता देण्यात येत असून त्यामुळे आता ज्या देशांना फायझर-बायोएनटेकची लस हवी असेल ते आयात परवाना मंजूर करू शकतात.
देशात २० हजारांवर नवीन रुग्ण
देशात कोविड १९ विषाणूचा संसर्ग असलेले आणखी २० हजार ३५ रुग्ण सापडले असून लागोपाठ १९ व्या दिवशी नवीन रुग्णांची संख्या तीस हजारांच्या खाली आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या १ कोटी २ लाख ८६ हजार ७०९ झाली आहे.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८.८३ लाख आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिवसभरात २० हजार ३५ रुग्ण नवीन सापडले असून मृत्यूंची संख्या १ लाख ४८ हजार ९९४ झाली आहे. एकूण २५६ नवीन रुग्ण मरण पावले आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या लागोपाठ अकराव्या दिवशी ३ लाखांच्या खाली राहिली आहे. कोविड १९ रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट २० लाख, २३ ऑगस्ट ३० लाख, ५ सप्टेंबर ४० लाख, १६ सप्टेंबर ५० लाख, २८ सप्टेंबर ६० लाख, ११ ऑक्टोबर ७० लाख, २९ ऑक्टोबर ८० लाखांवर, २० नोव्हेंबर ९० लाख याप्रमाणे होती ती १९ डिसेंबरला कोटीवर गेली. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार गुरुवारी १० लाख ६२ हजार ४२० नमुने तपासण्यात आले तर ३१ डिसेंबरअखेर एकूण १७,३१,११,६९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. २५६ बळी नव्याने गेले असून त्यात महाराष्ट्र ५८, केरळ ३०, पश्चिम बंगाल २९, छत्तीसगड २१ या प्रमाणे संख्या आहे. देशात १ लाख ४८ हजार ९९४ मृत्यू झाले आहेत. त्यात महाराष्ट्र ४९,५२१, तमिळनाडू १२,१२२, कर्नाटक १२,०९०, दिल्ली १०,५३६, उत्तर प्रदेश ८,३६४, आंध्र ७,१०८, पंजाब ५,३४१ या प्रमाणे बळी गेले आहेत. आतापर्यंत सत्तर टक्के मृत्यू हे सहआजारांनी झाले आहेत.